मुख्याध्यापक लाच घेताना जाळ्यात
By admin | Published: March 22, 2017 03:18 AM2017-03-22T03:18:48+5:302017-03-22T03:18:48+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाच्या कारवाईत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी
पिंपरी : लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाच्या कारवाईत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अलका कांबळे व क्रीडा प्रबोधिनीचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांना मंगळवारी लाचेची मागणी करताना जाळ्यात सापडले. त्यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पिंपरीतील उद्यमनगर येथे महापालिकेची क्रीडा प्रबोधिनी शाळा आहे. विद्यार्थी खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने ही क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे. क्रीडा शिबिरातील खेळाडूंना अल्पोपाहार पुरविण्याचे काम दिलेल्या कॅन्टीन ठेकेदारास बिल मंजुरीसाठी लाचेची मागणी केली. अनुकूल अहवाल आणि बिल मंजुरीसाठी १४ मार्च २०१७ ला त्यांनी २५ हजार रुपये लाच रकमेची मागणी केली, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आली होती. त्यातील पाच हजार रुपये मुख्याध्यापकांसाठी, उर्वरित २० हजार रुपये शिक्षणाधिकाऱ्यांसाठी मागण्यात आले होते. ठरल्यानुसार पैसे घेऊन आलेल्या व्यक्तीकडून मंगळवारी क्रीडा प्रबोधिनी शाळेजवळ त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली.
लाचलुचपत प्रतिबंधक पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, चंद्रकांत चौधरी, सुनील शेळके, किरण चिमटे, कारले, महिला पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.(प्रतिनिधी)