अतिवापरामुळे हेडफोन सिंड्रोमच्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:55 AM2019-01-07T01:55:44+5:302019-01-07T01:56:19+5:30

तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर वापर : अतिरेकी वापराने बहिरेपणाचा धोका

Headphone syndrome has increased due to overuse | अतिवापरामुळे हेडफोन सिंड्रोमच्या प्रमाणात वाढ

अतिवापरामुळे हेडफोन सिंड्रोमच्या प्रमाणात वाढ

Next

युगंधर ताजणे 

पुणे : कुणी कुणाशी काही बोलायचे नाही. शाळा-महाविद्यालयातून सुटका झाल्यावर, कामावरून घरी परतताना, इतकेच नव्हे, तर घरात सतत कानाला हेडफोन लावून गाणी ऐकण्याचे, कुणाबरोबर बोलणे सुरूच असते. दिवसभरात आठ तासांपेक्षा अधिक काळ हेडफोनचा वापर करून आता तरुणांमध्ये बहिरेपणा वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून तर कानाला हेडफोन लावून बोलण्याचे जे फॅड तरुणांमध्ये पसरले आहे त्याचे अनुकरण शाळेतील लहान मुले करताना दिसून येत आहे. या सगळ्याचा गंभीर परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असून पालकांनी त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर मोबाईल हीदेखील काळाची गरज होऊन बसली असताना त्याच्या जोडीने येणाऱ्या विविध अत्याधुनिक सोयी-सुविधा, त्याचे फायदे-तोटे याकडे सोयीने दुर्लक्ष करण्याचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. विशेषत: सातत्याने कानाला हेडफोन लावून बोलण्याच्या सवयीचे गंभीर पडसाद आता तरुणांच्या आरोग्यावर उमटू लागले आहेत. दिवसभर काम करताना, कामावरून घरी परतताना, प्रवासात असताना, कुठला उत्सव साजरा करताना, समारंभात सहभागी होताना, इतकेच नव्हे तर जेवतानादेखील अनेक जण हेडफोन काढणे टाळतात. दिवसातून सरासरी आठ तासांंपेक्षा अधिक काळ कानात अडकविलेल्या या हेडफोनमुळे बहिरेपणाचा धोका वाढला आहे. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. सोमनाथ सलगर म्हणाले, की तरुणांपेक्षा शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये हेडफोन सिंड्रोमचे प्रमाण लक्षणीयरीत्या आढळून येते. हेडफोन वापरण्याच्या सवयीचे रुपांतर पुढे व्यसनात होते. याचे गंभीर परिणाम मुलांवर होतात. अपघाताच्या धोक्याबरोबरच एकाग्रता कमी होणे, एकलकोंडेपणात वाढ होणे, स्वभावात चिडचिडेपणा येणे यासारखे प्रकार सातत्याने हेडफोन वापरण्यामुळे होतात. प्रमाणापेक्षा वापर वाढल्यास त्याचा परिणाम मज्जासंस्थेवरदेखील होतो. मोठ्यांकडे बघून त्यांच्या अनुकरणातून हेडफोन सिंड्रोम शालेय विद्यार्थ्यांमध्ये दिसू लागला आहे. पुण्यात वाहतूक प्रशासनाच्यावतीने हेल्मेटसक्ती केली आहे. वाहन चालविताना हेडफोनद्वारे मोबाईलवर बोलणे नियमाचा भंग करणारे असून आता हेडफोनवर बोलणाºयांचे प्रमाण लक्षात घेऊन नवीन हेल्मेटमध्येदेखील हेडफोनसाठी व्यवस्था केली आहे.

श्रवणक्षमतेवर परिणाम
कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. समीर जोशी यांनी सततच्या हेडफोनबाबत सांगितले, की सातत्याने ८ आठ तास ८० ते ९० डेसिबलपेक्षा जास्त क्षमतेचा आवाज कानावर पडत असल्यास त्याचे गंभीर परिणाम व्यक्तीच्या श्रवणक्षमतेवर दिसून येतात. त्याला बहिरेपण येते.
सुरुवातीच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात जाणवणारे बहिरेपण हे कायमस्वरुपी होऊन जाते.
कानठळ्या बसविणारा आवाज सारखा कानावर आदळत असल्यास बहिरेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाहन चालविताना हेडफोन लावून बोलणाºयांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. ज्या गोष्टीमुळे आपल्या जिवाला धोका आहे, याची माहिती असतानादेखील चुकीचे वर्तन केले जाते. विशेषत: तरुणांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी. वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे. दुचाकी असो किंवा चारचाकी वाहनचालकांना काही करून मोबाईलवर बोलायचे असते. परिणामी आपला जीव धोक्यात घालून ते हेडफोनच्या मदतीने फोनवर बोलत राहतात. नवीन वर्षात अशा वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. - तेजस्वी सातपुते, वाहतूक पोलीस उपायुक्त

मुळात कानात सतत हेडफोन लावण्याची गरज आहे का? हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा येतो आहे. चंचलता वाढत आहे. विशेषत: मोठ्यांचे अनुकरण करण्याची लहानांची सवय याचा तोटा त्यांना सहन करावा लागत आहे. पालकदेखील बिनधास्तपणे सातत्याने लहान मुले आणि विद्यार्थ्यांना हेडफोन वापरू देत आहेत. हेडफोनच्या रोजच्या वापराने एकाग्रतेवर प्रतिकूल परिणाम होतो. आज सगळ््यांना मोबाईलच्या माध्यमातूनच संवाद साधायचा आहे. कुणाशी बोलणे नको, घराबाहेर पडून मैदानावर खेळणे नको, यामुळे सर्वच वयांमध्ये कमालीचा एकलकोंडेपणा वाढीस लागला आहे. नैसर्गिक अभिव्यक्ती हरपून त्याची जागा यांत्रिकीकरणाने घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
- डॉ. निशिकांत थोरात, मानसिक आरोग्यतज्ज्ञ

Web Title: Headphone syndrome has increased due to overuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे