आरोग्य अभियानाच्या लेखापालाला लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:00+5:302021-05-19T04:12:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पोस्ट कोविड १९ चे फॉर्म व ऊस तोडणी कामगारांचे आरोग्य तपासणी पत्रिका छापण्याच्या कामाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोस्ट कोविड १९ चे फॉर्म व ऊस तोडणी कामगारांचे आरोग्य तपासणी पत्रिका छापण्याच्या कामाचे बिल काढण्याचा मोबदला म्हणून २० हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लेखापालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
विजय मधुकर चितोडे (वय ४५) असे या लेखापालाचे नाव आहे. जिल्हा परिषदेतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी सापळा लावून ही कारवाई केली.
तक्रारदार यांच्या कंपनीला पोस्ट कोविड १९ चे फॉर्म व ऊस तोडणी कामगाराच्या आरोग्य तपासणी पत्रिका छापण्याचे काम मिळाले होते. त्यांनी हे छपाईचे काम पूर्ण करुन त्याचे ५ लाख ७० हजार रुपयांचे बिल जिल्हा परिषदेला सादर केले होते. हे बिल मंजुरीसाठी लेखापाल विजय चितोडे याच्याकडे आले होते. तक्रारदार यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यावर बिलाच्या मंजुरीसाठी २५ हजार रुपये (५ टक्के)लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानुसार १७ मे रोजी पडताळणी केली. त्यात चितोडे याने तडजोड करून २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली़ मात्र, काल ते नसल्याने आज पुन्हा पडताळणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेत सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना विजय चितोडे याला पकडण्यात आले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ पोलीस निरीक्षक सुनील बिले अधिक तपास करीत आहेत.