भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे ऍप, घरबसल्या मिळतात रिपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 02:00 PM2018-05-03T14:00:36+5:302018-05-03T14:00:36+5:30
वाढत्या तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होत आहे. याचेच उदाहरण म्हणजे पुण्यातील भोर तालुक्यातील भोंगवली गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी 'पीएचसी भोंगवली' हे ऍप तयार केले आहे.
पुणे :वाढत्या तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होत आहे.याचेच उदाहरण म्हणजे पुण्यातील भोर तालुक्यातील भोंगवली गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी 'पीएचसी भोंगवली' हे ऍप तयार केले आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी लॉन्च करण्यात आलेल्या या ऍपमुळे सरकारी आरोग्य योजनांबद्दल गावातील नागरिकांची आस्था वाढत असून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
७ एप्रिल २०१८रोजी साजरा करण्यात आलेल्या यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची ''आरोग्याची उपलब्धता प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी'' ही संकल्पना होती. या संकल्पनेला अनुसरून डॉ अनिल राठोड यांनी भोंगवली आरोग्य केंद्राचे ऍप तयार केले. या ऍपमध्ये भोंगवली आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सूची देण्यात आली आहे. याशिवाय सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दर महिन्यात किती रुग्णांनी तासांनी केली याचा आकडेवारीचा अहवाल यामध्ये बघायला मिळतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाच्या तपासणीचे रिपोर्ट बघण्याची सोय आहे. त्यासाठी रुग्णाने आपला रिपोर्ट नंबर टाकला तर काही तासात तपासणीचा तपशील बघायला मिळतो . या सर्व सुविधांमुळे अवघा महिना संपण्याच्या आतच हे ऍप गावातील लोकांनी डाउनलोड केले असून तरुणांसह महिलाही याचा उपयोग करत आहेत.'
ऍपला मिळणारा प्रतिसाद बघून यापुढे खासगी डॉक्टरसारखी अपॉइंटमेंट घेण्याची सोयही यात उपलब्ध करण्यात येणार आहे. याशिवाय रुग्णांना लागणारे इतरही काही फिचर यात टाकणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे एका गावासाठी तयार करण्यात हे राज्यातील नव्हे तर देशातील पहिले ऍप असून लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील गावांसाठी अशा पद्धतीने ऍप तयार करण्याचा जिल्हा आरोग्य प्रशासनाचा मानस आहे.या ऍपची संकल्पना असलेले आरोग्य अधिकारी डॉ अनिल राठोड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला आम्ही टेस्टिंगसाठी ऍप लॉन्च केले होते. त्याला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा असून यातून अधिकाधिक योजना लोकांपर्यंत पोचाव्यात आणि सरकारी आरोग्य सेवेविषयी आस्था निर्माण व्हावी असा यामागचा उद्देश आहे.