उदे गं अंबे उदे..! शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ; यंदा ऑनलाईन दर्शनासह आरोग्याचा जागर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 12:30 AM2020-10-17T00:30:06+5:302020-10-17T00:41:54+5:30

राज्य शासनाने गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे.

Health awareness with online darshan at Navratra festival in Pune | उदे गं अंबे उदे..! शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ; यंदा ऑनलाईन दर्शनासह आरोग्याचा जागर

उदे गं अंबे उदे..! शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ; यंदा ऑनलाईन दर्शनासह आरोग्याचा जागर

Next
ठळक मुद्देघटस्थापना : शहरातील मंदिरांमध्ये अभिषेक, विधीवत पूजा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. शनिवारी (१७ ऑक्टोबर) चतु:शृंगी मंदिर, तांबडी जोगेश्वरी, भवानी माता, महालक्ष्मी अशा शहरातील विविध मंदिरांमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सकाळी ७ ते ९ दरम्यान पूजा, अभिषेक आणि घटस्थापना असे धार्मिक कार्यक्रम होतील. भाविकांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. पुढील नऊ दिवस विविध मंडळांतर्फे आरोग्याचा जागरही केला जाणार आहे.

राज्य शासनाने गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, यंदा सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. नियमावलीचे काटेकोर पालन करत देवस्थानांतर्फे अत्यंत साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. काही सार्वजनिक मंडळे ऑनलाईन लाईव्ह दर्शनाची सोय, तर काही मंडळे संकेतस्थळावर फोटो उपलब्ध करून देणार आहेत. नवरात्रोत्सवात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

चतु:शृंगी मंदिरामध्ये सकाळी नऊ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. नरेंद्र अनगळ यंदाच्या उत्सवाचे सालकरी आहेत. दररोज सकाळी दहा आणि रात्री साडेआठ वाजता आरती करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थानचे दिलीप अनगळ यांनी दिली. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी स्क्रीन लावण्यात येणार आहे. तेथे भाविकांना लाईव्ह दर्शन घेता येईल. मंदिराच्या भवतालच्या परिसरात आरोग्याबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत.

ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये सकाळी सात वाजता महापूजा आणि घटस्थापना होणार आहे. देवीच्या दररोजच्या पूजेचे छायाचित्र संकेतस्थळावर भाविकांना पाहता येणार आहे. भाविकांना मंदिराबाहेरून देवीचे दर्शन घेता येईल, अशी माहिती विनायक बेंद्रे यांनी दिली.
 
भवानी पेठेतील भवानी माता मंदिरामध्ये मुख्य विश्वस्त विनायक मेढेकर यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता महापूजा आणि घटस्थापना होणार आहे. श्री सूक्त पठण, ललिता सहस्रानाम, अष्टमीला नवचंडी याग असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, असे विश्वस्त नरेंद्र मेढेकर यांनी सांगितले. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात शनिवारी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. क्षमा उपलेंचवार आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नीलेश उपलेंचवार यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना होणार आहे.
 

Web Title: Health awareness with online darshan at Navratra festival in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.