प्रत्येक वयोगटातील महिलांनी निरोगी राहण्यासाठी करायला हव्यात आरोग्य तपासण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:10 AM2021-03-08T04:10:35+5:302021-03-08T04:10:35+5:30
पुणे : ‘आरोग्य हीच आपली संपत्ती आहे’ हे नेहमीच्या वापरातले वाक्य असले तरी बदलत्या जीवनशैलीत त्यातील मर्म वारंवार अधोरेखित ...
पुणे : ‘आरोग्य हीच आपली संपत्ती आहे’ हे नेहमीच्या वापरातले वाक्य असले तरी बदलत्या जीवनशैलीत त्यातील मर्म वारंवार अधोरेखित होत आहे. हल्ली महिलांची धावपळ, घर आणि नोकरी अशी कसरत वाढली आहे. मात्र, पूर्वीच्या महिलांच्या तुलनेत शारीरिक कष्ट कमी झाले आहेत. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वारंवार डोके वर काढू लागल्या आहेत. बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. आजार रोखण्यासाठी तरुणी आणि महिलांनी प्रत्येक वयोगटात काही आरोग्य तपासण्या नियमितपणे करून घ्याव्यात, असे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
संप्रेरकातील असंतुलनामुळे मानसिक अवस्था, शरीराचे तापमान, झोप, वाढ, भूक, ताण, चयापचय आणि प्रजननावर परिणाम होतो. हार्मोनल असंतुलन गर्भधारणा, प्रसूती, स्तनपान आणि रजोनिवृत्ती दरम्यान दिसून येतो. हे असंतुलन स्त्रियांमधील एस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, थायरोक्झिन, प्रोलॅक्टिन आणि कोर्टिसोल पातळीमधील चढ-उतार दर्शवते. प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कैशरीन खान म्हणाल्या, ‘हार्मोनल असंतुलनाची लक्षणे म्हणजे मूड स्विंग्स, झोप न येणे, कामेच्छा कमी होणे, वजन वाढणे, चिंता, थकवा, वेदनादायक मासिक पाळी, मासिक पाळी दरम्यान अतिस्राव, पाळीस विलंब होणे किंवा लवकर पाळी येणे, चेह-यावर अनावश्यक केस, मुरुमांची समस्या, थकवा आणि चिंता. हार्मोनल असंतुलनामुळे देखील पीसीओडी आणि वंध्यत्वासारख्या आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.’
थायरॉइड, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन आणि कोर्टिसोलची पातळी तपासण्यासाठी रक्ताच्या चाचण्या करून घ्याव्या. लोहाची कमतरता (अशक्तपणा) ओळखण्यासाठी सीबीसीसारखी चाचणीची करावी. थायरॉइड, प्रोलॅक्टिन, कोलेस्टेराॅल, व्हिटॅमिन डी, रक्तातील ग्लुकोज आणि कॅल्शियमची पातळी तपासा. महिलांनी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करणे आवश्यक आहे. स्तनांमध्ये कोणत्याही प्रकारची विकृती आढळल्यानंतर वेळीच निदान आणि उपचारांमुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रेरणा अग्रवाल यांनी दिली.
----------------
वयोगट आरोग्य तपासण्या
१२ ते १८ हिमोग्राम, युरिन (रुटीन), थायरॉईड फंक्शन टेस्ट,
मासिक पाळीमध्ये अनियमितता असल्यास हार्मोन तपासणी
१८ ते ३० हिमोग्राम, युरिन (रुटीन), थायरॉईड फंक्शन टेस्ट,
युएस पेलव्हिस, बोन डेन्सिटी
३१ ते ४० वरील सर्व चाचण्या आणि पॅप स्मियर, कोलेस्टेरॉल,
हार्मोन चाचणी, ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी
४० च्या पुढे वरील चाचण्या तसेच ब्लड शुगर (एफ, पीपी)
लिपिड प्रोफाईल, मॅमोग्राफी, कॉलपोस्कोपी, इसीजी
पूर्वगर्भधारणा रक्ततपासणी, थॅलेसमिया, सीकल सेल,
थायरॉईड, रुबेला, चिकनपॉक्स अशा लसी, व्हिटॅमिन कमतरता
गर्भभारणेदरम्यानवरील सर्व चाचण्या, सोनोग्राफी
--------------------
१२ ते १४ या वयातील मुलींमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी लसींचे तीन डोस घेण्याचा सल्ला दिला जातो. ४५ वर्षे वयापर्यंत लस घेता येते, मात्र त्याची परिणामकारकता कमी होते. गर्भधारणा करण्यात अडचण येत असल्यास १८ ते ३० वयोगटादरम्यान दरम्यान रक्त तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.
- डॉ. माधुरी बुरांडे लाहा, स्त्रीरोगतज्ज्ञ
-------------------------------------------
भारतीय समाजामध्ये महिला खाण्याकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता ही समस्या बहुतांश तरुणी आणि महिलांमध्ये आढळते. त्यामुळे केवळ आरोग्यावर नाही, तर कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. जंक फूड, हालचाल कमी
बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वजन वाढणे यामुळे थायरॉईडचा त्रासही उदभवतो. त्यामुळे तिशीनंतर थायरॉईडची चाचणीही नियमितपणे करुन घ्यायला हवी. पॅपस्मियरसारख्या कर्करोगावरील चाचण्यांबाबत अद्याप महिलांमध्ये जागरुकता पहायला मिळत नाही. अशा चाचण्या वेळीच केल्यास कर्करोगाचा संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. स्त्रीने कायम स्वत:च्या आरोग्याला महत्व दिले पाहिजे.
- डॉ. संतोष सिद्दीकी, स्त्रीरोगतज्ज्ञ