पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी डॉ. आशिष भारती यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 07:50 PM2020-09-30T19:50:15+5:302020-09-30T19:52:20+5:30
डॉ. रामचंद्र हंकारे यांच्या बदलीच्या आदेशाची माहिती महापालिका वर्तुळात मोठी चर्चिली जात होती..
पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य प्रमुखपदी बुधवारी डॉ. आशिष हिरालाल भारती यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी राज्य शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
पालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून काम पाहणारे विद्यमान आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांचा २५ सप्टेंबर, २०२० रोजी प्रतिनियुक्तीची कालावधी समाप्त झाला होता. त्यातच डॉ. हंकारे यांनीही महापालिकेच्या सेवेत न थांबण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांनी आपली येथून लवकरात लवकर बदली व्हावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. आज अखेर डॉ. हंकारे यांची पुण्यातील आरोग्य सेवा विभागात (कुटुंब कल्याण) येथे सहाय्यक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, या आदेशात डॉ. हंकारे यांची नियुक्ती पुन्हा मुळ संवर्गात करण्यात आली आहे.
डॉ. हंकारे यांच्या बदलीच्या आदेशाची माहिती महापालिका वर्तुळात दुपारीच मोठी चर्चिली जात होती. त्याचवेळी आता नवीन आरोग्य प्रमुख कोण यावर मोठी खमंग चर्चाही रंगली गेली. काहींनी प्रभारी आरोग्य प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. अंजली साबणे यांच्याकडेच काही दिवस हा पदभार राहील. तर, काहींनी डॉ. हंकारे यांना आपत्तीच्या काळात महापालिका कार्यमुक्त करणार का अशीची चर्चा रंगवली. मात्र डॉ़ हंकारे यांच्या बदलीच्या आदेशापाठोपाठ सायंकाळीच डॉ़आशिष भारती यांची नियुक्ती महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी प्रतिनियुक्तीने एक वर्षाच्या मुदतीसाठी करण्यात येत असल्याचे आदेश मंत्रालयातून आले़.परिणामी पुन्हा एकदा महापालिकेला प्रतिनियुक्तीवरच आरोग्य प्रमुख मिळाला आहे.
डॉ. भारती हे आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण) पुणे येथे सहाय्यक संचालक म्हणून गेली सहा वर्षे कार्यरत होते. ३० सप्टेंबर,२०२० पासून त्यांची पुढील एक वर्षाकरिता पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदी प्रतिनियुक्तीवर नेमणुक करण्यात आली आहे.
------------------------