आरोग्य पथक की मद्यपींचा अड्डा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 04:01 AM2018-05-26T04:01:54+5:302018-05-26T04:01:54+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षांची आरोग्य पथकाला अचानक भेट : असुविधांसह कचऱ्याचे साम्राज्य पडले दृष्टीस
दौंड : दौैंड येथील प्राथमिक आरोग्य पथकाच्या इमारतीला पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी अचानक भेट दिली. तेव्हा आरोग्य पथकाच्या परिसरात रिकाम्या दारूच्या बाटल्या, घाणीचे साम्राज्य होते आणि कुठलेही अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच, आरोग्य पथकाच्या संरक्षक भिंतीच्या आत खासगी गाड्या उभ्या केल्या जातात. तेव्हा हे आरोग्य पथक आहे की खासगी वाहनतळ? याचा उलगडा होत नसल्याची नाराजी देवकाते यांनी व्यक्त केली.
दरम्यान, रात्रीच्या वेळी या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे आहे, तर आरोग्य पथकाच्या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीसाठी २५ लाख रुपये मंजूर केले आहेत. तसेच, स्वच्छतागृह आणि नवीन प्रवेशद्वार बसविण्याकरिता २५ लाख रुपये मंजूर झालेले आहेत. परंतु, एकंदरीत परिस्थिती पाहता, २५ लाखांचा निधी कमी पडेल. तेव्हा वाढीव निधी देण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील, असे देवकाते यांनी सांगितले. जगदाळे चर्चा करताना म्हणाले, की सदरची वास्तू जुनी असून त्यावर पैसा खर्च केला, नव्याने आरोग्य पथकाची चांगली वास्तू शहरात उभी राहील.
ंअद्याप सुरक्षारक्षकाची नेमणूक नाही
दौैंड आरोग्य पथकाचा परिसर स्वच्छ केलेला आहे; परंतु संरक्षक भिंत नादुरुस्त असल्याने त्यातच सुरक्षारक्षक नसल्यामुळे काही मद्यपी दारू पिऊन बाटल्या टाकून जातात. या परिसरात सुरक्षारक्षकाची मागणी जिल्हा परिषदेकडे केली आहे; मात्र अद्याप सुरक्षारक्षक मिळालेला नाही.
- डॉ. अशोक रासगे
ठिकठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच
दौंड आरोग्य पथकाच्या संरक्षक भिंतीच्या आत ठिकठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या. रात्री येथे सुरक्षारक्षक नसतो. तेव्हा शहरातील काही मद्यपींना दारू पिण्यासाठी आरोग्य पथकाच्या व्हरांड्यात सोयीस्कर आणि सुरक्षित जागा मिळते. हे मद्यपी दारू पिऊन बाटल्या तिथेच टाकून देत असल्यामुळे ठिकठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसतात.