डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज; ५४७ जणांना नोटीस, १ लाख दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 09:39 AM2023-07-19T09:39:39+5:302023-07-19T09:39:50+5:30
आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील विविध सोसायट्या, हॉटेल, अन्य आस्थापना यांच्या मोकळ्या जागेत पाणी साचते का, याची पाहणी
पुणे : पावसाळा आला की डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताे. त्यामुळे खबरदारी म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील विविध सोसायट्या, हॉटेल, अन्य आस्थापना यांच्या मोकळ्या जागेत पाणी साचते का, याची पाहणी केली जाते. डेंग्यूचे डास उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्यास दंड ठोठावला जातो. या वर्षीही महापालिकेने पाहणी करून शहरातील ५४७ जणांना डेंग्यूच्या डास उत्पत्तीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख २३ हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे.
सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सध्या ५८२ संशयित रुग्ण असून, ३३ जणांना प्रत्यक्ष लागण झाली आहे. शहरात फेब्रुवारी महिन्यात डेंग्यूचे ११ रुग्ण आढळले होते, त्यानंतर जून महिन्यात १२ रुग्ण आढळले आहेत. पाऊस वाढल्यास या रुग्णांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणी साचून ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तसेच घरातील भांडी आठवड्यातून एक वेळा पूर्णपणे धुऊन कोरडी करावीत. कूलर, फ्रीज यातील पाणी आठवड्यातून एकदा बदलावे. घराच्या टेरेसवर व परिसरात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय पातळीवर स्वतंत्र तपासणी पथक तयार केले आहे. याद्वारे नित्याने विविध सोसायट्या, आस्थापना यांची पाहणी करून डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी औषध फवारणी केली जात असल्याचेही डॉ. देवकर यांनी सांगितले.