आरोग्य विभागच सलाईनवर
By admin | Published: September 22, 2016 01:46 AM2016-09-22T01:46:32+5:302016-09-22T01:46:32+5:30
विविध संसर्गजन्य आजारांनी वेढा घातलेला असताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे या समस्येवर उपाय तर नाहीच
पुणे : शहराला डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया यांबरोबरच विविध संसर्गजन्य आजारांनी वेढा घातलेला असताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे या समस्येवर उपाय तर नाहीच; पण आरोग्य विभागासाठी मान्य असलेली अनेक पदेही दीर्घ काळापासून रिक्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग सलाईनवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या रिक्त पदांची संख्या थोडीथोडकी नसून तब्बल ५१४ इतकी असल्याचे पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या मुख्य सभेत मिलिंद काची यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून हे समोर आले आहे. १,६६४ पदांची मान्यता असूनही त्यातील केवळ १,१५० पदेच भरली गेली असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
शहराचा वाढता आलेख, त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या आरोग्याच्या समस्या आणि त्यासाठी असणारी अपुरी सुविधा यांचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. एकीकडे खासगी वैद्यकीय सेवा महाग होत असल्याची ओरड होत असताना शहरातील मोठा वर्ग महापालिकेच्या आरोग्य सुविधांवर अवलंबून आहे. मात्र, या सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने सुविधा मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
>वस्ती क्लिनिक : कर्मचारी कोठून आणणार?
शहरात सप्टेंबरअखेरपर्यंत ५० वस्ती क्लिनिक चालू होणार असून, ही संकल्पना आरोग्य सुविधेच्या दृष्टीने उत्तम आहे. मात्र, या ठिकाणीही पालिकेतीलच आरोग्य विभागातील कर्मचारी काम करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. त्यामुळे एकीकडे आरोग्याच्या योजना राबवीत असताना त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने सध्या असलेल्या यंत्रणेवरच त्याचा भार येण्याची शक्यता आहे.
>पालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त असणाऱ्या पदांमध्ये वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी, विविध आजारांचे तज्ज्ञ यांच्याबरोबरच प्रयोगशाळेतील विविध पदे तसेच परिचारिका स्तरावरील आणि व्यवस्थापन स्तरावरीलही अनेक पदे समाविष्ट आहेत. आता ही पदे नेमकी कधी भरली जाणार, याची वाट पाहावी लागणार आहे.
एरवी पालिकेच्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात असणारी गर्दी आता असणाऱ्या साथीच्या आजारामुळे वाढली आहे. यामध्ये लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. मात्र, या गर्दीमुळे सध्या कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.
आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असली, तरीही ती विशेषज्ञ आणि इतर आहेत. त्यामुळे त्याचा पालिकेतील आरोग्याच्या कामावर फारसा परिणाम होत नाही. कीटक विभागातील ३५० पदे रिक्त आहेत; मात्र प्रत्येक वॉर्ड आॅफिसला ३० ते ४० पदे करारावर घेण्याची मान्यता देण्यात आल्याने सध्याच्या साथीच्या आजारांच्या कामावर या रिक्त पदांचा फारसा परिणाम होत नाही.
- डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका