आरोग्य विभाग! सेवेच्या दर्जात कमतरता,किरकोळ औषधांवरच भर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 03:30 AM2018-08-25T03:30:39+5:302018-08-25T03:30:50+5:30
महापालिकेचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) दिसायला चांगला; मात्र सेवेच्या दर्जात कमतरता, असा झाला आहे. गरीब वसाहतींमधील रुग्णांकडून ओपीडीला चांगला प्रतिसाद मिळतो;
राजू इनामदार
पुणे : महापालिकेचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) दिसायला चांगला; मात्र सेवेच्या दर्जात कमतरता, असा झाला आहे. गरीब वसाहतींमधील रुग्णांकडून ओपीडीला चांगला प्रतिसाद मिळतो; पण त्यांच्यावर अपेक्षित उपचार केलेच जात नाहीत, अशी स्थिती आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा निकष दर ५० हजार लोकसंख्येमागे एक बाह्य रुग्ण विभाग, असा आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार पुण्याची लोकसंख्या ३५ लाख आहे. त्यानुसार एकूण ७० बाह्य रुग्ण विभाग असणे गरजेचे आहे. महापालिकेच्या ४७ ओपीडी आहेत. म्हणजे २३ कमी आहेत. नव्याने ओपीडी सुरू करण्याचा महापालिकेचा काहीही विचार नाही, कारण सध्या असलेल्या ओपीडीमध्येच नियुक्ती करण्यासाठी डॉक्टर नाहीत. डॉक्टरची तब्बल ५७ पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. सर्व ओपीडी महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये आहेत. इमारतींची अवस्था चांगली आहे. रंगरंगोटी वेळेवर होते. फर्निचर चांगले आहे. ४७ पैकी १७ ओपीडी या प्रसूतिगृहांशी म्हणजे मोठ्या रुग्णालयांशी निगडित आहे. त्यामुळे तिथे फारशी अडचण येत नाही. फक्त ओपीडी आहेत, तिथे मात्र चांगली अवस्था नाही. डॉक्टरची संख्या मुळातच अपुरी असल्यामुळे जादा डॉक्टर देणे प्रशासनाला शक्य होत नाही. ५७ डॉक्टरची पदे रिक्त, आरोग्य विभागातच एकूण ५२८ पदे रिक्त असतानाही त्याकडे प्रशासन किंवा पदाधिकारी गंभीरपणे पाहायला तयार नाहीत.
आरोग्य आराखडा जाहीर करावा
बांधकाम विभागात मध्यंतरी अभियंत्यांची तब्बल २०० पदे भरली गेली; आरोग्य विभागात मात्र गेली अनेक वर्षे ५२८ मंजूर असलेली पदे रिक्त असूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. महापालिकेच्या वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे. यासाठी आयुक्तांनी स्वत: यात लक्ष घालून आरोग्य आराखडा तयार करावा व त्याची अंमलबजावणी करावी.
- विशाल तांबे, नगरसेवक
सुधारणा गरजेची
महापालिकेचा बाह्य रुग्ण विभाग हा शहरातील गरीब कुटुंबांचा फार मोठा आधार आहे. मात्र, त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. स्वतंत्र इमारत, डॉक्टर व अन्य कर्मचारी, औषधांचा नियमित पुरवठा एवढे सगळे असताना केवळ डॉक्टर नाही, कर्मचारी नाहीत म्हणून काही ओपीडी पूर्ण क्षमतेने चालत नाहीत, औषधे उपलब्ध नाहीत, असे सांगितले जाते ते अयोग्य आहे.
- महेश महाले, सामाजिक कार्यकर्ते