आरोग्य विभागच आता घडविणार ‘स्पेशालिस्ट’

By admin | Published: July 26, 2015 12:28 AM2015-07-26T00:28:02+5:302015-07-26T00:28:02+5:30

सरकारी रुग्णालय म्हटले की तेथे डॉक्टर नाहीत... ही ओरड राज्याच्या सर्व भागांमध्ये नेहमीचीच. स्पेशालिस्ट (विशेषज्ञ) डॉक्टरच मिळत नसल्याने राज्यातील अनेक शासकीय

Health Department will now make 'specialist' | आरोग्य विभागच आता घडविणार ‘स्पेशालिस्ट’

आरोग्य विभागच आता घडविणार ‘स्पेशालिस्ट’

Next

-  राहुल कलाल,  पुणे
सरकारी रुग्णालय म्हटले की तेथे डॉक्टर नाहीत... ही ओरड राज्याच्या सर्व भागांमध्ये नेहमीचीच. स्पेशालिस्ट (विशेषज्ञ) डॉक्टरच मिळत नसल्याने राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये ही पदे रिक्त आहेत. त्याचा विपरीत परिणाम आरोग्यसेवेवर पडत असल्याने ही पदे भरण्यासाठी आता राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग पुढे सरसावला आहे आणि त्यांनी स्वत:च अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या राज्यात वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय वैद्यकीय शिक्षण नावाने कार्यरत आहे. राज्यात त्यांच्यामार्फतच पदव्या आणि पदव्युत्तर पदवी, पदविकेचे अभ्यासक्रम मान्य केले जातात. परंतु, त्यांच्याकडून आरोग्य विभागाच्या शासकीय रुग्णालयात पुरेशा स्पेशालिस्ट डॉक्टरांचा पुरवठा होत नव्हता. त्याचबरोबर सरकारी रुग्णालयांमधील जागा आणि त्यांचे पगार हे खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी असल्याने डॉक्टरकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणारे तरुण सरकारी नोकरीकडे वळत नव्हते. या दोन्ही कारणांमुळे गेल्या काही वर्षांत शासकीय रुग्णालयांमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली होती.
राज्यात अनेक ठिकाणी सुपर स्पेशालिटी रुग्णालये, स्पेशालिटी विभाग उभारण्यात आले आहेत. मात्र, त्या रुग्णालयांमध्ये स्पेशालिस्टच नसल्याचे चित्र होते. त्यामुळे ही रुग्णालये पांढरा हत्ती ठरू लागली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने स्वत: पदव्युत्तर पदविका याचे ८ विषयांचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. 
ते लगेचच सुरू होणार आहेत.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरूवात
आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच २०१५-१६ पासून हे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. हे सर्व अभ्यासक्रम मुंबईतील कॉलेज आॅफ फिजीशियन अ‍ॅन्ड सर्जन्स या संस्थेच्या मानकानुसार घेतले जाणार आहे आणि या संस्थेची पदवी आरोग्य विभागाकडून संबंधित विद्यार्थ्यांना दिली जाईल.

हे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम होणार सुरू
डिप्लोमा इन आॅलथॅलमिक मेडिसिन अ‍ॅन्ड सर्जरी
डिप्लोमा इन गायनॅकॉलॉजी अ‍ॅन्ड आॅबस्टेट्रिक्स
डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ
डिप्लोमा इन पॅथॉलॉजी अ‍ॅन्ड बॅक्टेरीआॅलॉजी
डिप्लोमा इन अ‍ॅनेस्थेशिया
डिप्लोमा इन सायकॅट्री मेडिसिन
डिप्लोमा इन ट्युबरकुलोसिस डिसिजेस
डिप्लोमा इन ट्रान्स्फ्युजन मेडिसिन

स्पेशालिटीसाठीच्या रिक्त जागा ७-८ वर्षांत भरण्यासाठीचा प्रयत्न
सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये १४ स्पेशॅलिटी विभाग चालविले जातात. या विभागांमध्ये त्या-त्या विभागातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची आवश्यकता असते. सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आम्हाला हे स्पेशालिस्ट डॉक्टर १ वर्षाच्या बॉन्डसाठी मिळतात. परंतु ते एका वर्षानंतर निघून जातात. त्याचबरोबर थेट भरती केली जाते. पण या भरतीला अल्प प्रतिसाद मिळतो. त्यामुळे स्पेशालिस्ट डॉक्टरांची पदे रिक्तच राहतात. सध्या राज्यात अशी १८०० स्पेशालिस्ट डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. दर वर्षी साधारणत: ८२ स्पेशालिस्ट डॉक्टर मिळतात. असे राहिले तर ही पदे भरण्यासाठी ३०-४० वर्षे लागतील. हे रोखण्यासाठी आणि सरकारी रुग्णालयातील सुविधा वाढविण्यासाठी आम्ही हे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासक्रमातून दर वर्षी सुमारे २०० ते २५० स्पेशालिस्ट डॉक्टर आम्हाला मिळतील आणि रिक्त पदे ७-८ वर्षांत भरली जातील.
- डॉ. सतीश पवार,
संचालक, राज्य आरोग्य विभाग

Web Title: Health Department will now make 'specialist'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.