आरोग्य, शिक्षण हेच जीवनाचे महत्त्वाचे पैलू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:18+5:302021-05-11T04:11:18+5:30
पुणे : उत्तम आरोग्य ही चांगल्या जीवनाची पहिली पायरी असून, चांगल्या शिक्षणामुळेच माणसाला आरोग्यभान येते. कोरोनाच्या संकटाने हे अधोरेखित ...
पुणे : उत्तम आरोग्य ही चांगल्या जीवनाची पहिली पायरी असून, चांगल्या शिक्षणामुळेच माणसाला आरोग्यभान येते. कोरोनाच्या संकटाने हे अधोरेखित केले आहे. त्यामुळे आरोग्य आणि शिक्षण हेच जीवनाचे महत्त्वाचे पैलू आहेत, असे मत राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या ५७ व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजेश टोपे बोलत होते. त्या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू व राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.
कोरोना संकटातील भारती हॉस्पिटलचे कार्य उल्लेखनीय आहे, असे नमूद करून राजेश टोपे म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार झाला.
डॉ. सुखदेव थोरात म्हणाले, उच्च शिक्षणाचा विस्तार होत असताना गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. चांगल्या शिक्षकांचा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गुणवत्तावाढीसाठी करणे गरजेचे आहे.
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, विद्यापीठात संशोधनासाठी पूरक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राध्यापकांमध्ये ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती असायला हवी. भविष्यात मायक्रोलर्निंग आणि शॉर्ट टर्म अभ्यासक्रमाचे महत्त्व वाढणार आहे.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, भारती विद्यापीठाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या या संकटात विम्याचे सुरक्षा कवच दिले. शिक्षण क्षेत्रात प्रगतीची झेप घेताना भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रा. मिलिंद जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.