आरोग्य सुविधी विशिष्ट लोकांच्या हाती एकवटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:05+5:302021-05-06T04:11:05+5:30
बारामती : बारामती शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामध्ये तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती व ...
बारामती : बारामती शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामध्ये तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती व संस्था यांच्या हाती एकवटली आहे. तालुक्यातील निवडक मंडळींसाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन राबत असल्याचे चित्र दुर्दैवाने तयार झाले आहे. प्रशासनात समन्वय साधून तत्काळ सुधारणा करावी. अन्यथा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा भाजप नेते दिलीप खैरे यांनी दिला आहे.
खैरे यांनी याबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट लोकांच्या हाती गेली आहे. खरेतर ही राजकारण करण्याची वेळ नाही अथवा आरोग्यव्यवस्था पुरवताना दुजाभाव करण्याची ही वेळ नाही. परंतु ज्या पद्धतीने आरोग्य व्यवस्था व प्रशासनाचे केवळ शहरात तेही काही ठराव व्यक्ती पदाधिकाऱ्यांच्या हाती केंद्रीकरण झाले आहे ते पाहता तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील सर्वसामान्यांना कोणी वाली नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाल्याचे खैरे म्हणाले. प्रशासनाने प्रत्येक मंडलात कोरोना चाचणी केंद्रे उभारावीत, अशी मागणी यांनी केली आहे.
कोरोना उपाययोजनेत शहरी-ग्रामीण असा भेदभाव केला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने बारामती शहर व तालुक्यातील एकूण सार्वजनिक आरोग्य यंत्रणा व प्रशासन यांच्या दरम्यान समन्वय नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील कोविड रुग्णांची सरासरी ३५० वर राहत आहे. कोरोनाबाबत जनतेत निर्माण झालेली भीती, तपासणी केंद्रांची मर्यादित संख्या, तपासणी केल्यावर अहवाल मिळण्यासाठी होणारा विलंब, ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरनाची गैरसोय यातून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व वेगाने होत आहे. जी काही आरोग्य यंत्रणा आहे त्यावर सध्या प्रचंड ताण आहे. तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन असेल किंवा प्राथमिक उपचारातील फॅबी फ्लू गोळ्या किंवा पोस्ट कोड मधील काही औषधे वेळेवर मिळत नाहीत. त्यातून अनेकांचे जीव जात आहेत.
प्रशासनाने रेमडेसिविरचा रुग्णसंख्येनुसार न्याय पुरवठा करावा, खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट व्हावे, प्रत्येक मंडलामध्ये कोविड चाचणी केंद्रे सुरू करावीत, उपचारातील साधनसामग्री पुरवताना शहर-ग्रामीण, गरीब-श्रीमंत असा दुजाभाव त्वरित थांबवावा, अशा मागण्या खैरे यांनी केल्या आहेत.