आरोग्यास हानिकारक प्रकल्प आमच्याच माथी का? पुण्यात प्राण्यांच्या हॉस्पिटलला 'त्या' भागातील नागरिकांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 11:30 AM2022-09-21T11:30:43+5:302022-09-21T11:30:50+5:30

सर्व माजी नगरसेवकांनी या प्रकल्पास विरोध करण्यासाठी हालचाली चालू केल्या आहेत

Health harmful project on us Citizens of area protest against animal hospital in Pune | आरोग्यास हानिकारक प्रकल्प आमच्याच माथी का? पुण्यात प्राण्यांच्या हॉस्पिटलला 'त्या' भागातील नागरिकांचा विरोध

आरोग्यास हानिकारक प्रकल्प आमच्याच माथी का? पुण्यात प्राण्यांच्या हॉस्पिटलला 'त्या' भागातील नागरिकांचा विरोध

googlenewsNext

हडपसर : आज हडपसर परिसरात येथे कुत्र्यांसाठी होणाऱ्या हॉस्पिटलबाबत वृत्त पसरताच सगळीकडून रोषाच्या भावना व्यक्त झाल्या. कचरा प्रकल्प यासारखे आरोग्यास हानिकारक असे प्रकल्प आमच्याच माथी का, असा सवाल येथील माजी नगरसेवक, सामाजिक संस्था नागरिक यांनी केला आहे.

रामटेकडी, उरळी देवाची, फुरसुंगी, केशवनगर हा हडपसर औद्योगिक वसाहत या ठिकाणी कचऱ्याचे प्रकल्प झाले. याला येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. काल प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. याबाबत सर्व माजी नगरसेवकांनी या प्रकल्पास विरोध करण्यासाठी हालचाली चालू केल्या आहेत. प्रसंगी हे प्रकल्प होऊ नयेत यासाठी कोर्टातही जाण्याची तयारी दाखवली आहे.

शहरातील प्राणी व भटक्या कुत्र्यांच्या हॉस्पिटल्ससाठी मिशन पॉसिबल या संस्थेस ३३ वर्षांच्या कराराने मनपाची रामटेकडी येथील जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव काल स्थायी समितीच्या सभेत मान्य झाला. हडपसर विधानसभा मतदारसंघात अनेक त्रासदायक प्रकल्प सद्य:स्थितीत असून प्राण्यांच्या हॉस्पिटलमुळे हडपसर मतदारसंघातील नागरिकांच्या समस्येत भर पडणार आहे. मनपा प्रशासनाने हडपसरच्या नागरिकांच्या संयमाचा अंत बघू नये, असा इशारा शिवसेना (शिंदे गट) चे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी दिला आहे. हडपसरला प्राण्यांच्याऐवजी जिवंत माणसांसाठी मनपाच्या वतीने हॉस्पिटल उभारावे, अशी आमची मागणीही त्यांनी केली आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये केशवनगर, रामटेकडी, उरुळी देवाची या ठिकाणी सुमारे २२०० मेट्रिक टनाचा नवीन कचरा प्रकल्प महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजपने बहुमताने मंजूर करून घेतला आहे. त्यात प्राण्याच्या हॉस्पिटलची भर नको.

''हॉस्पिटलसाठी ३३ वर्षे कालावधीसाठी संयुक्त प्रकल्प रद्द करावा, अन्यथा या प्रकल्पाविरोधात जाणार - योगेश ससाणे, माजी नगरसेवक.''

''चांगले प्रकल्प हडपसर भागात यावेत, कचरा डेपोसारखे प्रकल्प येथे आणून येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करू नये. हा प्रकल्प रद्द करण्याबाबतची मागणी केली आहे. - मारुती तुपे, माजी नगरसेवक.''

''हडपसरचा वाहतुकीचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे. मेट्रो होणे गरजेचे आहे. आवश्यक असणारे चांगले प्रकल्प येथील नागरिकांना सोयीसुविधा देणे गरजेचे आहे. हा प्रकल्प येथून दुसरीकडे हलवण्यात यावा. - हेमलता मगर, माजी नगरसेविका.''

Web Title: Health harmful project on us Citizens of area protest against animal hospital in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.