Maharashtra | आरोग्यक्षेत्रात महाराष्ट्राला देशात अव्वल बनवणार : तानाजी सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:16 PM2023-02-18T13:16:28+5:302023-02-18T13:17:53+5:30
जनतेच्या जास्तीत जास्त सहभागाद्वारे आरोग्यक्षेत्रात महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार’, असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला...
पुणे : ‘गेल्या सहा महिन्यांत राज्य सरकारने आरोग्यक्षेत्रात अनेक नवनवीन योजना राबविल्या आहेत. ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून, जागरूक पालक, सदृढ बालक या नव्याने सुरू झालेल्या योजनेलाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील सर्व बालके सदृढ आणि निरोगी असावीत, असा संकल्प आरोग्य विभागाने केला आहे. जनतेच्या जास्तीत जास्त सहभागाद्वारे आरोग्यक्षेत्रात महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार’, असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हलच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्यसेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. केतन खाडे उपस्थित होते.
आगाशे म्हणाले, ‘चित्रपटांकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न बघता आरोग्य शिक्षणासाठी त्याचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करता येतो. आरोग्य विभागाने ते दाखवून दिले आहे.’ आयुक्त धीरज कुमार यांनी जनतेपर्यंत आरोग्य योजना पोहोचविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले.
या फेस्टिव्हलसाठी राज्यभरातून १५५ प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यापैकी ११८ प्रवेशिका आरोग्य विषयाशी निगडित होत्या. आठ परीक्षकांमार्फत परीक्षण करून गुणांकन करण्यात आले. यापैकी ५ टीव्ही स्पॉट, ५ माहितीपट असे एकूण १० विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.