आधी रुग्णाला उपचार द्या, मग कागदपत्रे पाहा; आराेग्यमंत्री तानाजी सावंतांच्या स्पष्ट सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 12:13 PM2022-09-29T12:13:37+5:302022-09-29T12:15:22+5:30

शेतकऱ्यांसाठी २४ तास काॅल सेंटर

Health Minister Tanaji Sawant's clear instructions Treat the patient first, then look at the documents | आधी रुग्णाला उपचार द्या, मग कागदपत्रे पाहा; आराेग्यमंत्री तानाजी सावंतांच्या स्पष्ट सूचना

आधी रुग्णाला उपचार द्या, मग कागदपत्रे पाहा; आराेग्यमंत्री तानाजी सावंतांच्या स्पष्ट सूचना

Next

पुणे : रुग्णालयात आलेल्या रुग्णाकडे कागदपत्रांसाठी पोलिसांसारखी चौकशी करू नका. आधी त्याच्यावर उपचार करा, मग कागदपत्रे पाहा. काेणताही रुग्ण उपचारांपासून वंचित ठेवू नका, अशा स्पष्ट सूचना आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आराेग्य क्षेत्रातील डाॅक्टर, कर्मचारी यांना दिल्या.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून माता नवरात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व 'माता सुरक्षित, तर घर सुरक्षित' या अभियानाचा प्रारंभ पुण्यातील श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) महाविद्यालयातील सभागृहात आराेग्यमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, आरोग्य संचालक साधना तायडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार, पुणे परिमंडळचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. विजय कंदेवाड, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू प्रा. डॉ. रुबी ओझा उपस्थित होते.

सावंत म्हणाले...

- सर्व कुटुंबासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या राज्यातील साडेतीन काेटी मातांची नवरात्रात आराेग्य तपासणी करून त्यांना माेफत उपचार दिले जातील.

- गराेदर महिलांना तीन महिन्यांनंतर प्रसूतीपर्यंत प्रतिदिन ३०० रुपये भत्ता देण्याचाही विचार सुरू आहे, असेही सावंत म्हणाले.

- बीपी, डायबेटिस, ॲनेमिया हे आजार आधीच कळाल्यास त्यावर उपचार व्हावे म्हणून हा उपक्रम राबवत आहे. शेवटच्या महिलेपर्यंत ही सुविधा सुरू राहील.

डॉ. व्यास म्हणाले की, या अभियानाद्वारे दाेनच दिवसांत पावणेचार लाख महिलांची आराेग्य तपासणी केली. त्याद्वारे नऊ हजार ६१७ महिलांना मधुमेह, १२ हजार महिलांना उच्च रक्तदाब आढळला. ९० हजार गरोदर महिला तपासणी केली, असता नऊ हजार रक्तदाब व सहा हजार महिलांना ॲनिमियाचे निदान झाले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात ‘आभा’ या डिजिटल हेल्थ कार्डाचे वाटप करण्यात आले. प्रत्येक नागरिकांना हे कार्ड काढता येणार असून, याद्वारे रुग्णाचा वैद्यकीय इतिहास डिजिटल स्वरूपात राहणार आहे.

प्रास्ताविक डॉ. साधना तायडे यांनी केले, तर डॉ. कंदेवाड यांनी आभार मानले. आयईसी ब्युरोचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी कार्यक्रम संयाेजनासाठी प्रयत्न केले.

शेतकऱ्यांसाठी २४ तास काॅल सेंटर

शहरात उपचारासाठी साधने आहेत; मात्र, शेतकऱ्यांना बांधावर उपचार मिळावे यासाठी २४ तासांसाठी १०४ हे काॅल सेंटर सुरू करण्यात येईल. अर्ध्या तासाच्या आत यंत्रणा शेतकऱ्यापर्यंत पाेहोचेल व त्याला प्राथमिक उपचार मिळेल. तसेच गरजेनुसार पुढील उपचार मिळतील.

काय आहे अभियान

- तीन भागांत हा कार्यक्रम राबवणार असून, यामध्ये तपासणी, समुपदेशन व उपचार दिले जाणार आहे.

- राज्यातील सर्व १८ ते ३५ वयोगटातील मातांची तपासणी शासकीय आराेग्य केंद्रात होणार.

- ३० वर्षांपुढील सर्व महिलांची डायबिटीस, थायरॉइड, ॲनिमिया तपासली जाईल.

- गरज पडल्यास कॅन्सर तपासणी व शस्त्रक्रिया महात्मा फुले याेजनेतून केली जाणार.

Web Title: Health Minister Tanaji Sawant's clear instructions Treat the patient first, then look at the documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.