बारामतीत लसीकरण केंद्रावर राडा; आरोग्य कर्मचारी आणि नागरिक आमने सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 07:50 PM2021-07-24T19:50:38+5:302021-07-24T20:30:54+5:30
लसीकरणात अन्याय झालेली गावे उपमुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार
सांगवी : कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. तर परिस्थिती हाताळताना डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना सांगवीतील काही पदाधिकाऱ्यांनी थेट दम भरला. याचवेळी सांगवी आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखालील इतर गावांत पहाटेपासून रांगेत थांबून देखील लस उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी आणि नागरिकांत वादावादी होत आहे. यामुळे आता इतर गावातील लस न मिळालेले नागरिक थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.
बारामतीचे आरोग्य प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यातच ताळमेळ नसल्याने केंद्रावर रोज मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. गर्दी व गोंधळामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांना पाचारण करून बंदोबस्तात लसीकरण करण्यात आले. ग्रामीण भागात स्थानिक लोकप्रतिनिधी, तरुणांची लसीकरण कर्मचाऱ्यांना दमदाटी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. तर मध्येच येऊन रजिस्ट्रेशन करत असल्याने अवघ्या काही मिनिटात कुपन संपल्याचे सांगितल्याने रांगेतील नागरिकांनी एकच गदारोळ करत संतप्त प्रतिक्रिया दिली.
अनेक पुरुष व महिला रांगेत उभे राहूनही ज्यांना टोकन मिळाले नाही, ते लोक आक्रमक झाले. यामुळे एकच गदारोळ उडाला. नेमके याचवेळी अनेक नागरिकांना दोन टोकन देण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली. रांगेतील काही नागरिक आणि लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांत वादावादी सुरू झाली.
मदतकार्याच्या नावाखाली ओळखीच्या लोकांचं रजिस्ट्रेशन ....
आरोग्य केंद्रात काही तरुण व पदाधिकारी मदत कार्याच्या नावाखाली घुसखोरी करून आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणून ओळखीच्या चार ते पाच व्यक्तींचे एकाच वेळी रजिस्ट्रेशन करून कुपन घेऊन लस दिली जात आहे. याकडे मात्र पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र, लसीकरणापासून वंचित राहू लागले आहेत.