कामबंद आंदोलनात आता पुणे, पिंपरी महापालिकेतील आरोग्य अधिकारी-कर्मचारीही उतरले
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: November 5, 2023 05:02 PM2023-11-05T17:02:36+5:302023-11-05T17:03:03+5:30
आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे जवळपास ३००० जण सहभागी
पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियानचे डाॅक्टर व कर्मचा-यांचे आंदाेलन आणखीच पेटले असून उदयापासून म्हणजेच साेमवारपासून कामबंद आंदाेलन करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे जिल्हयातील ग्रामीण भागातील समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे जवळपास तीन हजार जण सहभागी हाेणार आहेत. इतकेच नव्हे तर याआधी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील कर्मचारी सहभागी नव्हते आता तेदेखील सहभागी झाले आहेत.
पुणे जिल्हा परिषदेसमोर सोमवारी (दि. ६) रोजी सर्व कर्मचारी मिळून कामबंद आंदोलन करणार आहेत. शासनाला जागे करण्यासाठी यावेळी सकाळी १० वाजता जागरण गोंधळ घालणार आहोत, असे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी-कर्मचारी समायोजन कृती समितीचे राज्य समन्वयक हर्षल रणवरे यांनी सांगितले.
या आंदाेलनात पुणे जिल्हयातील वैदयकीय अधिकारी ७५०, नर्सेस १५० तसेच औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तालुकास्तरीय आणि जिल्हा स्तरीय अधिकारी असे एकूण २७५० त्याचबरोबर पुणे महापालिकेतील आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १४०० कर्मचारी-अधिकारी हे देखील कामबंद आंदोलनांत उतरले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या शासनातील समायोजन तसेच सामायोजन होईपर्यंत सामान काम समान वेतन, या मागणीसाठी २५ आॅक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केलेले आहे, असे राज्य समन्वयक हर्षल रणवरे यांनी सांगितले.