जिल्ह्यात अनधिकृत गुऱ्हाळ चालकांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:10 AM2021-03-31T04:10:24+5:302021-03-31T04:10:24+5:30
हवेली तालुक्यातून भीमा, मुळा–मुठा या दोन नद्या, खडकवासला कालवा व जुना बेबी कालवा या सर्वांना बारमाही पाणी उपलब्ध असते. ...
हवेली तालुक्यातून भीमा, मुळा–मुठा या दोन नद्या, खडकवासला कालवा व जुना बेबी कालवा या सर्वांना बारमाही पाणी उपलब्ध असते. त्यामुळे येथे हजारो हेक्टर ऊस शेतकरी उत्पादित करत असतात. या साखर कारखान्याव्यतिरिक्त हजारोंच्या संख्येनी बारमाही चालणारी उसाची गुऱ्हाळे रात्रंदिवस सुरु आहेत. प्रत्येक गुऱ्हाळांवर आरोग्यास अपायकारक व घातक असलेल्या टायर, चप्पला, प्लास्टिक कागद यांचा भट्टीसाठी सर्रास वापर होत आहे. खुलेआम नागरिकांच्या आरोग्याशी चाललेल्या या खेळाकडे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासन मंडळ यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा गुऱ्हाळांवर प्रशासन विभागाने कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे सर्वसामान्य नागरिकांची मागणी होऊ लागली आहे.
अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६ नुसार कोणत्याही पदार्थाचे उत्पादन व विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील बहुतांश गुऱ्हाळघर मालकांनी विनापरवाना हा व्यवसाय थाटात सुरू केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात उत्पादित होणारा गूळ आणि विक्री विनापरवानाच सुरू असल्याचे उघड होत असून अन्न सुरक्षा विभाग नेमके या गोष्टींकडे का दुर्लक्ष करत आहेत हा प्रश्न अनुत्तरित आहे. अनेक गुऱ्हाळे ही परप्रांतीय चालवत आहेत. धुरामुळे घशात खवखव होणे, डोळ्यांची जळजळ होणे, सर्दी, खोकला, दमा आदी आजार होत असतात. दम्याच्या रुग्णांना कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. अगोदरच कोरोनाचे सावट असताना ऑक्सिजन लेव्हल नागरिकांची कमी जास्त होत आहे त्यामध्ये जर अशी परिस्थिती राहिली तर रुग्णांसाठी ती घातक आहे .अशा रुग्णांनी मास्क घालण्याची आवश्यकता असल्याचे कुंजीरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लुकडे यांनी सांगितले.