सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात
By admin | Published: January 24, 2017 01:18 AM2017-01-24T01:18:29+5:302017-01-24T01:18:29+5:30
मोई(ता. खेड) येथील रसायनमिश्रित पाण्यामुळे इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे. खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहणारी
कुरुळी : मोई(ता. खेड) येथील रसायनमिश्रित पाण्यामुळे इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे. खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहणारी तीर्थक्षेत्र देहू-आळंदी व शेतीला वरदान असणारी इंद्रायणी नदी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रसायन, मैलामिश्रित सांडपाण्यामुळे जीवघेणी ठरू लागली आहे.
पावसाळ्यात इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असते. रसायन, मैलामिश्रित सांडपाण्यामुळे पाणी दूषित झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
रसायन, मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता पिंपरी-चिंचवड महापालिका थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडते. यामुळे जनावरेही हे पाणी पित नाहीत. सातत्याने हे पाणी नदीपात्रात सोडल्याने जलचर प्राणी कमी होत आहेत.
नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ सुमारे वीस ते पन्नास रुपये खर्च करून पिण्यासाठी पाणी विकत घेत आहेत. यामुळे परिसरातील ग्रामस्थ, नागरिकांना अनेक प्रकारच्या आजाराने मरणयातना सहन कराव्या लागत आहे. या पाण्यामुळे परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.(वार्ताहर)