हॉटेल चालकांकडून आरोग्यविषयक नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:12 AM2021-01-03T04:12:18+5:302021-01-03T04:12:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्राहकांना टेबलवर एका आड एक बसवावे, न बसणाऱ्या टेबलवर फुली मारून ठेवावी, हा हॉटेलांसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्राहकांना टेबलवर एका आड एक बसवावे, न बसणाऱ्या टेबलवर फुली मारून ठेवावी, हा हॉटेलांसाठी अनलॉक करताना जाहीर केलेला नियम सर्रासपणे धाब्यावर बसवला जात आहे. या सगळ्याला प्रतिबंध करणरी यंत्रणाच शहरात नाही.
सरकारने हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी देताना त्यासाठी नियम घालून दिले आहेत. त्यात प्रामुख्याने ग्राहकांना टेबलवर एक टेबल मोकळे सोडून दुसरे टेबल या पद्धतीने बसवावे असा नियम आहे. एखादा अपवाद वगळता शहरात त्याचे कुठेही पालन होताना दिसत नाही. विशेषत: प्रसिद्ध हॉटेल चालकांनी व जवळपास सर्वच परमीट रूम व्यावसायिकांनी हा नियम धाब्यावर बसवलेला दिसतो आहे.
सरकारी नियमाप्रमाणे हॉटेल चालवायचे तर त्यांच्या थेट उत्पन्नावरच परिणाम होत असल्याने या नियमाचे पालन होत नाही. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता तसेच उपनगरांमधील परमीट रूम व हॉटेलमध्येही रोज ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यांना जवळजवळ बसवले जात आहे. परमीट रूममधील स्थिती तर यापेक्षाही वाईट आहे. तिथे टेबल वाढवून ग्राहकांची व्यवस्था केली जात आहे.
प्रत्येक ग्राहक गेल्यानंतर त्या आसनाचे सॅनिटायझर लावून निर्जंतूकीकरण करणे आवश्यक आहे. त्याचेही पालन होत नाही. ग्राहक आल्यानंतरही त्याला सॅनिटायझर देणे बंधनकारक आहे. ते दिले जात नाही. प्रवेशद्वाराजवळ लावलेले सॅनिटायझर अनेक ठिकाणी तुटलेले आहेत, त्यावर दिखाव्यासाठी म्हणून बाटली ठेवलेली असते.
कोरोनाचा धोका कायम आहे, तो वाढतो आहे, तरीही इतके नियम तोडले जात असताना त्याला आळा घालणारी सरकारी यंत्रणाच शहरात अस्तित्वात नाही. साधा मास्क घातला नाही म्हणून वाहनचालकांना दंड करणाऱ्या पोलिसांचे यासाठी कोणतेही पथक नाही. कोरोना आपत्तीमधील प्रतिबंधक उपाय व त्याची अंमलबजावणी याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. मात्र, त्यांचेही यासाठी एखादे स्वतंत्र पथक वगैरे नाही. त्यामुळेच मास्क नाही म्हणून दंड वसूल केलेली आकडेवारी प्रसिद्ध होत असली तरी आरोग्यविषयक नियम पाळले नाही म्हणून हॉटेल किंवा परमीट रूमवर कारवाई झाल्याचे मात्र एकही उदाहरण नाही.
आसनसंख्या कमी ठेवण्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या परमीट रूम व हॉटेल व्यावसायिकांकडून पाणी ग्लासातून देऊ नये या नियमाचे पालन मात्र अगदी काटेकोरपणे केले जात आहे. या नियमाचा आधार घेत अनेक हॉटेल व परमीट रूममध्ये बाटलीबंद पाणी विकत घेण्याची सक्ती ग्राहकांना केली जात आहे. ग्लास व पाण्याचे जग चालकांनी गायबच करून टाकले जात आहेत.