आरोग्यसेवा कोलमडली
By admin | Published: October 22, 2015 02:57 AM2015-10-22T02:57:10+5:302015-10-22T02:57:10+5:30
टोलेजंग इमारत उभारूनदेखील बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयास तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारीच मिळत नाहीत. त्यामुळे अवघ्या ४ पूर्णवेळ अधिकाऱ्यांच्या
बारामती : टोलेजंग इमारत उभारूनदेखील बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयास तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारीच मिळत नाहीत. त्यामुळे अवघ्या ४ पूर्णवेळ अधिकाऱ्यांच्या जिवावर रुग्णालय चालते. २४ तास ड्युटी केल्यावर, काही वैद्यकीय अधिकारी थेट आठवड्यानेच सेवेत येतात. टोलेजंग इमारत बांधण्यात आली; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांना गंभीर आजारांसाठी खासगी दवाखान्यांचाच आधार घ्यावा लागत आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरल्या नाहीत. त्यामुळे गंभीर आजारांवर या रुग्णालयात उपचाराच होत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यांना थेट पुण्याच्या ससून किंवा शहरातील खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. बारामती शहरात खासगी रुग्णालयांमध्ये गोरगरीब जनतेला वैद्यकीय सेवा परवडत नाही. त्यामुळे शहरातील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाची सेवा सुधारणार कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.
रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर, मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. सध्या फक्त ४ वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ आहेत. सध्या मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. मीरा चिंचोलीकर या काम पाहत आहेत. डॉ. अलकनंदा वैद्य, डॉ. यास्मिन पटेल स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.तर डॉ. रणजीत मोहिते बालरोग तज्ज्ञ आहेत. डॉ. प्रज्ञा तांभारे प्रतिनियुक्तीवर औंध हॉस्पिटलला काम करतात. डॉ. अतुल वणवे फक्त शनिवारी उपलब्ध होतात. डॉ. युवराज हाके, डॉ. प्राजक्ता कांबळे हे हंगामी तत्त्वावर आहेत. (प्रतिनिधी)
डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधांतरीच : एक्स्प्रेस फीडर कधी?
बारामती नगरपालिकेचे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरण करताना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्तीनंतरची पेन्शनची जबाबदारी नगरपालिकेवर सोपविण्यात आली. ३ डॉक्टर, २ नर्स, १ लॅब टेक्निशियन, १ एक्स रे टेक्निशियन, १ क्लार्क असे ९ जण उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवेत आहेत. त्यांच्या वेतनश्रेणीसह अन्य प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत.
वीज महावितरण कंपनीने २०११ मध्ये रुग्णालयाला अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी १ कोटी ३० लाख रुपये अनामत म्हणून भरून घेतले आहेत; मात्र पाच वर्षांनंतर तांत्रिक अडचणी काढून महावितरणकडून ‘एक्स्प्रेस फीडर ’ सेवा दिलेली नाही. त्याचबरोबर उदवाहनाची सोय (लिफ्ट) करण्याची तरतूद आहे; परंतु लिफ्टची सोय अद्याप करण्यात आलेली नाही.
आयसीयु सेवाही बंदच
रुग्णालयात तातडीची सेवा युनिट (आयसीयु) केवळ फिजिशीयन नसल्याने बंद आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांवर या ठिकाणी उपचार होत नाहीत. हृदयरोगासह अन्य शस्त्रक्रिया करण्याची सोय त्यामुळे होत नाही.
वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ७४ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या ४ पदे कायमस्वरूपी आहेत. त्याचबरोबर आॅनकॉल खासगी डॉक्टरांना बोलाविण्यात येते. नर्सची पदे भरण्यात आली आहेत. चतुर्थश्रेणीची पदे कंत्राटी पद्धतीने भरली आहेत. स्वच्छतेचे कामदेखील ठेकेदारी पद्धतीने दिले आहे. तरीदेखील पूर्णक्षमतेने मनुष्यबळ मिळत नाही. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळात १०० खाटांचे रुग्णालय चालविले जात आहे.
- आझिनाथ खारतोडे,
प्रभारी , कार्यालयीन अधीक्षक