गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिकेसह विविध संस्था, संघटनांची आरोग्य यंत्रणा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 08:05 PM2019-09-11T20:05:39+5:302019-09-11T20:23:21+5:30
शहरात तातडीच्या १०८ रुग्णवाहिकेद्वारेदेखील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच अन्य भागांत सुमारे २७ ठिकाणी वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहेत....
पुणे : ‘बाप्पांना वाजत गाजत निरोप देण्यासाठी उद्या (12 सप्टेंबर) अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. मिरवणुकीत भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह विविध संस्था, संघटनांकडून वैद्यकीय सेवा पुरविल्या जाणार आहेत.
महापालिकेच्या वैद्यकीय दवाखान्यांमध्ये अत्यावश्यक सुविधा देण्याबरोबरच डॉक्टर्स स्कॉड, खासगी रूग्णालयांमध्ये काही खाटा आरक्षित ठेवणे तसेच तातडीच्या 108 रूग्णवाहिका देखील तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच कोटणीस दवाखान्याबाहेर डिजीटल प्रेझेटेंशन दाखविण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे यांनी दिली.
पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाकडून यंदाच्या वर्षीही वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर चार ठिकाणी रुग्णवाहिका व सहा ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तैनात ठेवल्या जाणार आहेत. बेलबाग, एसपी कॉलेज, अलका टॉकीज व पूरम चौक(टिळक रस्ता) या ठिकाणी रुग्णवाहिकेद्वारे तसेच गोखले हॉल लक्ष्मी रस्ता, नारायणपेठ पोलिस चौकी केळकर रस्ता, ग्राहकपेठ टिळक रस्ता, स्वीट होम कुमठेकर रस्ता, दत्तवाडी रस्ता, आयुर्वेद रसशाला कर्वे रस्ता या ठिकाणीही सेवा देण्यात येणार आहे.शहरात तातडीच्या १०८ रुग्णवाहिकेद्वारेदेखील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच अन्य भागांत सुमारे २७ ठिकाणी वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये अलका चौक, बेलबाग चौक, नगरकर तालीम चौक, मंडई, नारायण पेठ पोलिस चौकी, नागनाथ पार सदाशिव पेठ, झेड ब्रीज, शनिवार वाडा, स. प. कॉलेज, विजय टॉकीज चौक, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, तसेच खडकवासला धरण या ठिकाणी रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. त्याशिवाय पिंपरी-चिंचवड, थेऊरमध्येही रुग्णवाहिका असणार आहेत, अशी माहिती १०८ रुग्णवाहिकेच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
निरंजन सेवा भावी संस्थेच्या वतीने फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मिनी रुग्णालय उभारण्यात आले आहे. येथे गणेशोत्सवात येणा-या भाविकांसह पोलिसांना वैद्यकीय सेवा देण्यात येते. वैद्यकीय यंत्रणेसह १४ जणांची टीम यामध्ये कार्यरत आहेत. या मिनी रुग्णालयात सर्व प्रकारची औषधे, इंजेक्शन, सलाइन, बेड यासह अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र विभाग केला आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व यंत्रणेसह १० डॉक्टर व ४ परिचारिकांची टीम सज्ज आहे. हा उपक्रम गणेशोत्सवात गणेश विसर्जनापर्यंत विनामूल्य सुरू राहणार आहे. या रुग्णालयाजवळ रुग्णवाहिका सज्ज असेल, तसेच शनिवारवाड्याजवळील सूर्य सह्याद्री रुग्णायात तातडीची वैद्यकीय सेवा दिली जाईल. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे जयेश कासट यांनी केले आहे.