रुग्णवाढ होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:56+5:302021-06-20T04:08:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क म पुणे : ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांची गर्दी वाढू लागली ...
लोकमत न्यूज नेटवर्क म
पुणे : ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु कोरोनाचा धोका अजूनही गेलेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहू नये व जास्तीत जास्त दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेने देखील आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे आदेश त्यांनी दिले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सिल हॉल येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी पवार बोलत होते. या वेळी खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, ॲड. वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार दिलीप मोहिते, सुनील शेळके, ॲड. अशोक पवार, संजय जगताप, सुनील टिंगरे, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य तयारी केली असली तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे.
----------------
तालुक्यात एक तरी ऑक्सिजन प्लांट हवा
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कमीत कमी एक तरी ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर कार्यान्वित करावा. ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करावा. तसेच संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ग्रामीण भागात सीएचओ, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य सहायक यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षित बालरोग तज्ज्ञ नियुक्त करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असेही पवार यांनी सांगितले.