आरोग्य यंत्रणा सक्षम असायला हवी
By admin | Published: April 25, 2015 05:09 AM2015-04-25T05:09:26+5:302015-04-25T05:09:26+5:30
आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घटना घडली, तर त्याचा परिणाम दुसऱ्या टोकावर होतो
पिंपरी : आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घटना घडली, तर त्याचा परिणाम दुसऱ्या टोकावर होतो. कोणतीही घटना घडली, तरी ती निवारण्यासाठी आरोग्य यंत्रणांना काम करावे लागते. त्यामुळे या यंत्रणांनी कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी उपयुक्त व सज्ज असले पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील ‘सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि व्यवस्थापन’ या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यशाळा अटलांटा (अमेरिका) येथील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रीव्हेन्शन (सीडीसी) केंद्र सरकारच्या नॅशनल डिझॅस्टार मॅनेजमेंट अॅथॉरिटी (एनडीएमए) आणि नवी दिल्ली येथील एम्सच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
सीडीसीचे सहयोगी संचालक डॉ. विकास कपिल, अमेरिकेतील इमोरी विद्यापीठाचे डॉ. झियाद काझी, डॉ. राजीव शर्मा, डॉ. प्रवीण अग्रवाल, इंडुसेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सागर गलवणकर, डॉ. सचदेव, इमोरी विद्यापीठाचे डॉ. डेरेन इसनोर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे संचालक डॉ. पी. डी. पाटील, उपसंचालक भाग्यश्री पाटील, सचिव यशराज पाटील, सचिव सोमनाथ पाटील, विद्यापीठाच्या ट्रस्टी स्मिता जाधव उपस्थित होत्या.
डॉ. कपिल म्हणाले, ‘‘जगात मोठ्या प्रमाणावर नवनवीन रोगांच्या साथी येत आहेत. त्याचा परिणाम लगेच सगळीकडे पडतो. त्यामुळे कोणत्याही देशातील आरोग्य यंत्रणांनी गाफील राहून चालणार नाही. त्यासाठी त्यांनी आधीच येणाऱ्या संकटावर मात करण्याची तयारी केली पाहिजे. या साथी मोठ्या प्रमाणात पसरत असतात. त्यासाठी सरकार, खासगी संस्था, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.’’
गलवणकर म्हणाले, ‘‘कोणत्याही आजाराचे रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीचे काय उपचार करायचे, याची माहिती असली पाहिजे. त्यासाठी नवीन डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कोणतीही नैसर्गीक आपत्ती आणली, तर त्यामध्ये काम करण्यासाठी सैन्य दलातील लोकांना प्रशिक्षण दिलेले असते. तसे प्रशिक्षण आरोग्य यंत्रणांनाही असले पाहिजे. सामान्य नागरिकांना ते नसते. मात्र, त्यांनाही आपत्तीमध्ये काम करण्याची माहिती दिली पाहिजे.’’
डॉ. पाटील म्हणाले, ‘‘देशातील व राज्यातील सर्वच घटनांमध्ये अनेक ठिकाणी तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे. त्यातील अनुभव विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडत आहेत. तरीही अशा घटनांमध्ये व्यवस्थित माहिती देऊन नागरिकांचे प्राण वाचणे महत्त्वाचे असते.’’ (प्रतिनिधी)