लस घेतलेल्या कर्मचाऱ्याची प्रकृती उत्तम : डॉ. भारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:13 AM2021-01-19T04:13:42+5:302021-01-19T04:13:42+5:30
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी महापालिकेच्या नायडू रुग्णालयात दाखल ...
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी महापालिकेच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सुधारली असून, त्याला घरी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, उद्या महापालिका हद्दीत ८ केंद्रांवर प्रत्येकी १०० आरोग्यसेवकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ पण, कोविन अँपमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने सोमवारी दुपारपर्यंत ५ केंद्रावर लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़
डॉ़ भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाच्या पहिल्या दिवशी पुण्यात ८ केंद्रांवर ४३७ आरोग्यसेवकांना लस देण्यात आली आहे. हे सर्व जण आरोग्य सेवक असून, या सर्वांची प्रकृती उत्तम आहे. मंगळवार पासून शनिवार पर्यंत आठही केंद्रांवर प्रत्येकी १०० अशा ८०० सेवकांना लस देण्यात येणार असून, कोविन अँपवर नोंद केलेल्या सेवकांनाच ही लस दिली जाणार आहे़ परंतु आतापर्यन्त ५ केंद्रावरील सेवकांनाच अँपवरून मेसेज गेले आहेत. अँपमधील तांत्रिक अडचणींमुळे उर्वरित ३ केंद्रावरील लसीकरणाचा कार्यक्रम आतापर्यंत तरी अनिश्चित आहे. रात्री उशिरापर्यंत उर्वरित ३ केंद्रांवरील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
लसीकरण हे ऐच्छिक आहे. त्यामुळे नोंदणी केलेला प्रत्येक व्यक्ती लस घेईलच याबद्दल साशंकता आहे. परंतु अधिकाअधिक सेवकांनी लस घ्यावी यासाठी आमचे प्रयत्न राहील. केंद्राने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार गरोदर महिला व तसेच कोरोनाची लागण होऊन केवळ दोन महिने झालेल्यांना लसीकरणातून वगळण्यात येणार असल्याचेही डॉ़ भारती यांनी सांगितले़
----------------------------------------