बारामती: संकेतस्थळावरून लग्नाचे आमिष दाखवून मुलींना फसविणारा आरोग्य कर्मचारी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 12:24 PM2022-01-08T12:24:16+5:302022-01-08T12:35:17+5:30
अनेक मुलींची फसवणूक : आरोग्य कर्मचारी गजाआड
सांगवी : लग्न संकेतस्थळावरून मुलींना लग्नाचे आमिष दाखवत त्यांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या तरुणाला तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. अजयकुमार नंदकुमार चटौला (रा. रुई रुग्णालय शासकीय वसाहत, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे आहे. आरोपी मला आई-वडील नाहीत, मी एकटाच आहे. मी सरकारी नोकरीला असून, अविवाहित असल्याची बतावणी करीत असे. तसेच विवाहाशी संबंधित संकेतस्थळावर अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करत पैशांना गंडा घालत असे. त्यानंतर आरोपी पोबारा करीत असे. त्याला बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचत गुरुवारी (दि ६) भोर येथून अटक केली.
मुंबई येथील एका ३९ वर्षीय पीडित महिलेने, लग्न संकेतस्थळावरून आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले. तसेच आपली पैशाची फसवणूक करून बलात्कारप्रकरणी मुुंबईत १ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आरोपीला शुक्रवारी (दि. ५) बारामती न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी चटौला हा बारामती येथील रुई शासकीय रुग्णालयात ‘स्विपर’ म्हणून कार्यरत आहे. तो विवाहित असूनदेखील शादी डॉट कॉमवर मुलींना ‘रिक्वेस्ट’ पाठवत असे. तसेच सरकारी नोकरदार असल्याचे सांगून त्यांच्याशी मैत्री करून जवळीक साधायचा. मुलींच्या कुटुंबीयांना भेटून विश्वास संपादन करीत असे. मुलीला सोबत घेऊन पर्यटनाला जात मुलीशी शारीरिक संबंध ठेवत असे. त्यांच्याकडून पैशांची गरज असल्याचे सांगून लाखो रुपये लुबाडत असल्याचे उघड झाले आहे.
आरोपी चटौला हा पुण्यातील एका मुलीसोबत नेहमीप्रमाणे खोटे बहाणे करून तिला पळवून आणून भोर येथील एका रूमवर रहात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे, दत्तात्रय मदने, चालक तुषार लोंढे हे भोर येथे आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले होते. त्यानुसार तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.