जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी लसीकरणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:35+5:302021-06-01T04:08:35+5:30

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठा गाजावाजा करत कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात शंभर टक्के आरोग्य कर्मचारी ...

Health workers in the district are deprived of vaccinations | जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी लसीकरणापासून वंचित

जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी लसीकरणापासून वंचित

Next

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठा गाजावाजा करत कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात शंभर टक्के आरोग्य कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होऊ शकले नाही. एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल २१ हजार ९५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळायचा आहे.

जिल्ह्यात एकूण ४९ हजार ३२ आरोग्य कर्मचारी आहेत. त्यापैकी आतापर्यंत २१ हजार ९५६ जणांना दोन्ही डोस मिळालेले आहेत.

केंद्र शासनाने राज्य शासनाला पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यात ४९ हजार ३२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली. यापैकी शंभर टक्के कर्मचाऱ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला. दरम्यान, शासनाने दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण सुरू केले. याचदरम्यान सहव्याधी व ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. तोपर्यंत लसीकरण व्यवस्थितपणे सुरू होते, पण काही प्रमाणात लसीचे डोस कमी पडू लागले होते. हे सर्व सुरू असतानाच केंद्र शासनाने १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे देखील लसीकरण सुरू केले. यामुळेच लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी होऊन लसीकरणाचे डोस कमी पडू लागले. यामुळे शासनाने पुन्हा १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण थांबवत पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस पूर्ण करण्याचे आदेश दिले. परंतु अद्यापही हजारो आरोग्य कर्मचारी लसीकरणापासून वंचित आहेत. तर फ्रंटलाईन वर्कर्समध्ये देखील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही.

------

लसीकरणाचा नियोजनशून्य कारभार

आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे केंद्र शासनाचे आदेश असताना देखील जिल्ह्यातील आजही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स लसीकरणापासून वंचित आहेत. यामध्ये २०-३० टक्के लोकांना पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेण्याचा कालावधी देखील लोटला आहे. परंतु प्रशासनाच्या पातळीवर या संदर्भात कोणतेही नियोजन नाही. यामुळेच दुसरा डोस शिल्लक असून, लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश देऊनही जिल्ह्यात अद्यापही हजारो आरोग्य कर्मचारी लसीकरणापासून वंचित आहेत.

----

Web Title: Health workers in the district are deprived of vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.