बाटलीबंद पाण्यातून आरोग्याशी खेळ

By admin | Published: April 23, 2017 04:16 AM2017-04-23T04:16:17+5:302017-04-23T04:16:17+5:30

हवेलीच्या पूर्व भागातील उरुळी कांचन, सोरतापवाडी, इनामदारवस्ती, गुंजाळमळा, लोणी काळभोर, कवडीपाट या ठिकाणी अनधिकृत मिनरल वॉटर कंपन्यांचा सुळसुळाट झाला

Healthy game in bottled water | बाटलीबंद पाण्यातून आरोग्याशी खेळ

बाटलीबंद पाण्यातून आरोग्याशी खेळ

Next

कोरेगाव मूळ : हवेलीच्या पूर्व भागातील उरुळी कांचन, सोरतापवाडी, इनामदारवस्ती, गुंजाळमळा, लोणी काळभोर, कवडीपाट या ठिकाणी अनधिकृत मिनरल वॉटर कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही परवाना न घेता तसेच कोणतेही निकष न पाळता बाटलीबंद पाण्याचे सर्रास उत्पादन व विक्री सुरू आहे. पाणी शुद्धतेचे निकष न पाळले गेल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
होत आहे.
विशेष म्हणजे, ब्रँडेड कंपन्यांचे डुप्लिकेशनही जोरात सुरू आहे. यामुळे पैसे मोजून घेतलेले पाणी शुद्ध असेलच, याची खात्री देता येत नाही. दूषित व क्षारयुक्त पाणी वाढल्यामुळे आता बाटलीबंद पाण्याची मागणी मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छोट्या-मोठ्या कंपन्या, हॉटेल-ढाबे, पर्यटनस्थळे, रेल्वे व बस स्थानके या ठिकाणी बाटलीबंद पाण्याला मागणी असते. अशुद्ध पाण्यापासून दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून बाटलीबंद पाणी पिण्याकडे नागरिकांचा कल असतो. ही गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या ब्रँडबरोबरच स्थानिक पातळीवरील ब्रँडही बाजारात उपलब्ध आहेत. बाटलीबंद पाण्याची वाढत जाणारी बाजारपेठ लक्षात घेता, येथेही नफेखोरांनी शिरकाव केला आहे.
सध्या उन्हाळा सुरू असल्याने बाटलीबंद पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे, असे मत कुंजीरवाडीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब निगडे यांनी व्यक्त केले.

अनधिकृत प्लांटदेखील कार्यरत? : कंपनीची विश्वासार्हता तपासा...
नफेखोरांनी अनधिकृत प्लांट टाकून शुद्धतेचे निकष धुडकावून बाटलीबंद पाण्याच्या बाजारपेठेत घुसखोरी केली आहे. ही घुसखोरी इतकी मोठी आहे, की त्यांनी तब्बल ५० टक्के बाजारपेठ काबीज केली आहे. अधिकृत कंपन्यांच्या वितरणव्यवस्थेलाही खिंडार पाडून बनावट उत्पादनही बाजारात खुलेआम विकले जात आहे. अनधिकृत व बनावट ब्रँडमधून मिळणारा नफा लक्षात घेऊन किरकोळ व्यावसायिकही अशाच पाण्याची तडाखेबंद विक्री करीत आहेत. परंतु, ही बाब ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मात्र धोकादायक बनली आहे.
नागरिक किंवा कार्यालयांनी बाटलीबंद पाणी विकत घेताना त्यावर आयएसआय, एफएसएसएआय मार्क, बॅच नंबर, कंपनीचा पत्ता आणि सील पाहावे. कॉर्पोरेट कंपन्या, व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या जारमधील पाणी उपलब्ध करून देताना, एकदा तरी आपण घेत असलेल्या कंपनीच्या विश्वासार्हतेची पाहणी करावी, प्लांटला भेट द्यावी. तसेच, एका लिटरच्या वापरलेल्या बाटल्या कचऱ्यात फेकण्याआधी क्रश करून टाकाव्यात.

विहिरीचे पाणी बाटलीत ?
पुणे-सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या बेबी कॅनॉलच्या बाजूला विहीर पाडून त्या पाण्याचा वापर करून बाटलीबंद पाणी थंड करून राजरोस विक्री सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.अशा विनापरवाना व्यवसायावर त्वरित कारवाई करावी.
- सागर चौधरी, माजी सरपंच, सोरतापवाडी

आरोग्याला हानिकारक
अधिकृत पाणी बाटलीची किंमत या अनधिकृत बाटल्यांपेक्षा जास्त असल्याने नागरिकांचा या अनधिकृत बाटल्या घेण्याकडे जास्त कल आहे; पण त्यामुळे त्यांच्या आरोग्याला खूप धोका आहे. या अनधिकृत व्यवसायामुळे आमच्यासारख्या अधिकृत पाणी व्यवसायाला मार बसत आहे.
- सचिन धुमाळ, अधिकृत विक्रेता

या अनधिकृत मिनरल वॉटर व्यवसायाची सिंहगड रोड व नगर रोडला आम्ही तपासणी करून कारवाई केलेली आहे. लवकरच सोलापूर रोडवरील तपासणी करणार आहोत.
- देवानंद वीर,
अन्न निरीक्षक, हवेली,
अन्न व औषध प्रशासन विभाग ,पुणे

Web Title: Healthy game in bottled water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.