आरोग्यवर्धक कुळीथ किंवा हुलगा ;थंडीत नक्की खाऊन बघा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 01:59 PM2020-01-04T13:59:46+5:302020-01-04T14:03:27+5:30
थंडीत उष्णता वाढवणारे आणि ताकद देणारे कडधान्य म्हणून कुळथाचे सेवन केले जाते, जाणून घेऊया कुळथाचे फायदे
पुणे : थंडीत उष्णता वाढवणारे आणि ताकद देणारे कडधान्य म्हणून कुळथाचे सेवन केले जाते. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते.कुळीथामुळे वात व कफ कमी होतो. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्तींना देण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यात, पितप्रकृतीच्या माणसांनी मात्र कुळीथ खाऊ नये. कुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हल्के असतात.ते शरीरामध्ये वात व पित्त दोष वाढवितात व कफ दोष कमी करतात.
कुळथाचे उपयोग खालीलप्रमाणे :
- खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करावा. अंगातील ताप कमी करते. सर्दी-पडसे झाले असता छातीतील कफ बाहेर टाकण्यास कुळिथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास मदत होते.
- पचायला हल्के,वातकफनाशक,पित्तकर,वात पुढे सरकवणारे,भुक वाढविंणारे,उष्ण असून चवीला तिखट,तुरट असते.
- कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून प्यायल्यास हे एक नैसर्गिक मूत्रल द्रवासारखे उपयोगी आहे. मूतखडा बाहेर घालविण्यास मदत होते. मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा होते, सूज कमी करते.
- भरपूर ताकात कुळीथ शिजवून जिरे, तुपाची फोडणी दिली की उत्तम कढण तयार होते. हे कढण वातनाशक, रुची उत्पन्न करणारे आहे.
- अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्याने खूप चांगला उपयोग होतो.