८0 वर्षांच्या वृद्धाची पीककर्जासाठी हेळसांड
By admin | Published: April 27, 2017 04:45 AM2017-04-27T04:45:28+5:302017-04-27T04:45:28+5:30
वय वर्षे ८0 असूनही वारंवार हेलपाटे मारूनही पीककर्ज मिळत नसल्याने अखेर येथील एका वृद्धाने सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे.
ओझर : वय वर्षे ८0 असूनही वारंवार हेलपाटे मारूनही पीककर्ज मिळत नसल्याने अखेर येथील एका वृद्धाने सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे.
जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे म्हाळुंगे विविध कार्यकारी सोसायटीने ही हेळसांड चालवली आहे. रामभाऊ तुकाराम पारखे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सन २०१६-१७ साठी १ लाख २६ हजार पीक कर्ज घेतले होते. ते कर्ज मी ३१ मार्च १७ पूर्वी भरले आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात मी अनेकवेळा हेलपाटे मारूनही सचिवाने मला पीक कर्ज दिले नाही. उलट मला उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. माझ्यासारख्या अनेक वृद्ध माणसांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या तीव्र उन्हाळा असून, वारंवार हेलपाटे मारने आम्हाला शक्य नाही.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महाव्यवस्थापक यांच्याकडेदेखील या वृद्धाने अर्ज केला आहे. या सोसायटीच्या सचिवाकडून तोंड पाहून कामे केली जात आहेत. ज्यांचा वशिला आहे त्याचीच पीक कर्जे तातडीने मंजूर केली जातात, असे अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुका अध्यक्ष माऊली पारखे यांनी सांगितले. (वार्ताहर)