डीएसकेंच्या जामिनावर १३ मार्चला सुनावणी, सरकार पक्षाने मागितला वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 03:47 AM2018-03-06T03:47:49+5:302018-03-06T03:47:49+5:30
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डीएसके दाम्पत्याच्या जामिनावर येत्या १३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे़ दरम्यान, डी़ एस़ कुलकर्णी यांच्या वकिलांनी न्यायालयात ८०० कोटी रुपयांची मालमत्ता विक्रीसाठी परवानगी मिळावी, असा अर्ज केला आहे.
पुणे - ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डीएसके दाम्पत्याच्या जामिनावर येत्या १३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे़ दरम्यान, डी़ एस़ कुलकर्णी यांच्या वकिलांनी न्यायालयात ८०० कोटी रुपयांची मालमत्ता विक्रीसाठी परवानगी मिळावी, असा अर्ज केला आहे.
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती यांना गेल्या गुरुवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे़ टी़ उत्पात यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर करून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे़ या वेळी त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता़
या अर्जाची विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे़ टी़ उत्पात यांच्यासमोर सुनावणी झाली़ सरकार पक्षाने जामीन अर्जावर आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती केली़ त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी १३ मार्च रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले़
याशिवाय, डीएसके यांची ८०० कोटी रुपयांची मालमत्ता विकण्यास परवानगी मिळावी़ ती ४२ लाख स्क्वेअर मीटर जागा असून त्यात जमीन, इमारतींचा समावेश आहे़ त्याच्या विक्रीतून आलेले पैसे
आम्ही न्यायालयात जमा
करतो़ त्यातून सध्या ठेवीदारांची २३२ कोटी रुपयांची थकबाकी आहे़, ती एकरकमी देता येईल, अशी विनंती गुरुवारी न्यायालयाला केली असल्याचे अॅड़ चिन्मय इनामदार यांनी सांगितले़
या अर्जावरही १३ मार्चला सुनावणी होईल.
1 ठाणे येथील एका मालमत्तेच्या प्रकरणात डी़ एस़ कुलकर्णी यांना ६ कोटी ५५ लाख रुपये मिळणार आहेत़ ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी हे पैसे मिळावेत, असा अर्ज डी़ एस़ कुलकर्णी यांचे वकील चिन्मय इनामदार यांनी सोमवारी न्यायालयात केला़
2 यावर आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस अधिकारी नीलेश मोरे यांनी मुंबई पोलिसांना ही रक्कम हवी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले़ त्यावर येथील न्यायालयात आम्ही प्रथम अर्ज केला आहे़; त्यामुळे ही रक्कम पुण्यातील ठेवीदारांना मिळावी, असे म्हणणे डी़ एस़ कुलकर्णी यांच्या वकिलांनी मांडले़