कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची सुनावणी अर्ध आभासी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:15 AM2021-09-17T04:15:04+5:302021-09-17T04:15:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची सुनावणी पुढील आदेश येईपर्यंत अर्ध आभासी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची सुनावणी पुढील आदेश येईपर्यंत अर्ध आभासी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुनावणीसाठी वकील, साक्षीदार, पोलीस, पत्रकार तसेच इतर नागरिकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौकशी आयोगाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पुढील सुनावणी पुण्यात होणार आहे.
केवळ साक्षीदार आणि संबंधित वकिलांना कोर्ट हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. वकिलांची संख्या बैठकीच्या व्यवस्थेपेक्षा जास्त असल्यास प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देऊन प्रवेश दिला जाणार आहे. वकिलांना सामावून घेतल्यानंतर हॉलमध्ये जागा रिक्त राहिल्यास प्रथम येईल त्यास प्रवेश देण्यात येईल. तसेच प्रत्येक अशिलाच्या एका वकिलास कोर्ट हॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. आयोगाच्या कार्यालयाला भेट देणाऱ्या सर्वांनी मास्क घालणे, सॅनिटाइज करणे, सामाजिक अंतर पाळणे आदी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन चौकशी आयोगाने केले आहे.