थेऊरच्या यशवंत कारखान्याची सुनावणी सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 07:17 PM2018-04-10T19:17:22+5:302018-04-10T19:17:22+5:30
यशवंतच्या अवसायकांनी ६ मार्च रोजी यशवंतच्या घेणेदार-देणेदार यांनी साठ दिवसात म्हणणे मांडावे अशी जाहीर नोटीस दिली होती.
पुणे : राज्यसरकारने थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना अवसायनात काढल्याप्रकरणी सभासद शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या सोमवारी (दि. १६) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी ही याचिका दाखल केली होती. मात्र, त्यावर एकदाही सुनावणी झाली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचिकेवर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.
यशवंतच्या अवसायकांनी ६ मार्च रोजी यशवंतच्या घेणेदार-देणेदार यांनी साठ दिवसात म्हणणे मांडावे अशी जाहीर नोटीस दिली होती. त्यानुसार संस्थेचे कामकाज गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे कळविले गेल्याने यशवंतच्या सभासदांमधे अस्वस्थता पसरली आहे. अवसायकांनी साखर आयुक्तांना यशवंत सुरु करता येणे शक्य असल्याचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात सादर केला आहे. कारखाना जर सुरु करायचा असेल तर त्यासाठी ४२ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे त्यांनी कळविले होते. दरम्यान, संस्थेचे कामकाज गुंडाळण्याबाबत नोटीस जाहीर केली गेल्याने सभासदांच्या मालकीच्या यशवंत कारखान्याच्या भविष्या बद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.
यशवंत कारखाना चुकीच्या पद्धतीने अवसायनात काढण्यात आला आहे. इतर अनेक कारखान्यांपेक्षा यशवंतची स्थिती चांगली आहे. या बाबी आम्ही उच्च न्यायलयाच्या निदर्शनास आणून देऊ. तब्बल वीस हजार सभासदांच्या मालकीचा हा कारखाना आहे. कोणत्याही स्थितीत हा कारखाना अवसायनात गुंडाळला जाऊ नये, अशी शेतकरी सभासदांची भावना असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अॅड. योगेश पांडे यांनी सांगितले.