तृप्ती देसाईंच्या जामिनावर आज सुनावणी
By admin | Published: July 17, 2017 04:15 AM2017-07-17T04:15:52+5:302017-07-17T04:15:52+5:30
भुमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जासाठीच्या सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादीला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भुमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जासाठीच्या सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादीला न्यायालयात उपस्थित ठेवावे असे आदेश न्यायालयाने जिल्हा सरकारी वकीलांना दिले असून विशेष जिल्हा न्यायाधीश आनंद के. पाटील यांच्या न्यायालयात सोमवारी ही सुनावणी होणार आहे.
विजय अण्णा मकासरे यांनी तृप्ती देसाई व अन्य चौघांविरुद्ध अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे़ त्याविरोधात देसाई व इतरांनी अॅड़ मिलिंद पवार यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता़
सरकार पक्षाच्या वतीने विलास घोगरे यांनी युक्तिवाद केला व अॅट्रोसिटी कायद्यातील नवीन आलेल्या तरतुदी नुसार जामीनाच्या सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादीला देखील नोटीस काढून त्याचे काय म्हणने आहे ते ऐकून घ्यावे व मगच जामीन अर्जावर निकाल द्यावा असा युक्तिवाद केल्याने सोमवार १७ रोजी विजय मकासरे यांना न्यायालयात उपस्थित ठेवावे असे आदेश जिल्हा सरकारी वकील यांना दिले. मकासरे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाकडून अटकपूर्व जामीनावर निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे़