ST Strike: पुण्यात एसटी कर्मचाऱ्याला निलंबनाचे पत्र वाचून हृदयविकाराचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 06:06 PM2021-11-30T18:06:11+5:302021-11-30T18:06:26+5:30
विलीनीकरणाच्या मागणीसाठी काही कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाने त्यांच्या निलंबनाच्या कारवाईला सुरुवात
पुणे : गेल्या महिनाभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यावर राज्य सरकारने तोडगा काढून कर्मचाऱ्यांचे पगार वाढ करण्याचे जाहीर केले. मात्र विलीनीकरणाच्या मागणीसाठी काही कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाने त्यांच्या निलंबनाच्या कारवाईला सुरुवात केली. अशातच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली असून शिवाजीनगर डेपो मध्ये काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याला सेवासमाप्ती चे पत्र आल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला आहे. बापू मारुती घडसिंग असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी शिवाजीनगर डेपो येथे आंदोलनाला मध्ये बसलेले असताना ते पत्र वाचून अचानक घडसिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना घरी नेण्यात आले होते. पण दुखणे असह्य झाल्याने त्यांना तातडीने धानोरी परिसरामधील रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचारासाठी दाखल केले आहे.
गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या आग्रही मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र सध्या हा निर्णय कोर्टात असल्याने विलिनीकरणावर तातडीनं निर्णय घेता येणे शक्य नाही असं राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान, एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधील विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी अडल्याने या संपामध्ये निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्याची घोषणा करण्यात आली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या घोषणेनुसार कर्मचाऱ्यांना ४१ टक्क्यांपर्यंत तसेच कमाल ५ हजारांपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यात एसटी सुरु झाल्या होत्या. पुणे शहरातही मागच्या आठवड्यात लालपरी धावली होती. पण काही कर्मचारी संपावर ठाम होते. ते राज्य सरकार मध्ये महामंडळाचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची त्यांची भूमिका होती. म्हणून महामंडळांने अशा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु ठेवली.
शिवाजीनगर आगारप्रमुखांनी दिली वेगळीच माहिती
या प्रकरणाबद्दल शिवाजीनगरचे एसटी आगार प्रमुख यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी मला याबद्दल काहीच माहित नसल्याचे सांगितले आहे. तसेच त्या चालकाबरोबरच इतर २१ जणांवर तीन दिवसापूर्वी कारवाई झाली असल्याचे ते म्हणाले आहेत.