Raksha Bandhan: मनं जिंकणारं प्रेम! मुक्ताईने पाठवली माऊलींना राखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 10:07 IST2023-08-30T10:07:05+5:302023-08-30T10:07:30+5:30
मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण भाविकांनी प्रत्यक्ष अनुभवला

Raksha Bandhan: मनं जिंकणारं प्रेम! मुक्ताईने पाठवली माऊलींना राखी
आळंदी : रक्षाबंधन म्हणजे बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग म्हणून ओळखला जातो. यापार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईबाई संस्थांनच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव व सोपानदेव या तिन्ही देवरुपी संत भावंडांना रक्षाबंधन निमित्त राखी अर्पण करण्यात येते. यंदाही आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर येथून माऊलींना राखी आली आहे.
तीर्थक्षेत्र आळंदीत बुधवारी (दि.३०) पहाटे माऊलींच्या संजीवन समाधीला श्री मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर यांच्यातर्फे पुरुषोत्तम वंजारी यांनी संपत्नीक पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा संपन्न करण्यात आली. त्यानंतर माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं तर्फे आदिशक्ती मुक्ताबाईला साडी चोळी भेट म्हणून देण्यात आली. याप्रसंगी लाहुळकर महाराज, संदीप पालवे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान दर्शनबारीतून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण भाविकांनी प्रत्यक्ष अनुभवला. दिवसभरात पंचवीस हजारांहून अधिक भाविकांनी समाधीचे दर्शन घेतल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.