हृदयद्रावक! दुचाकी - कंटेनर अपघातात बाप - लेक जागीच ठार, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 09:05 PM2023-09-30T21:05:50+5:302023-09-30T21:09:55+5:30
दोघांनाही उपचारार्थ तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून ते किरकोळ जखमी आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत सावंत यांनी दिली.
तळेगाव दाभाडे: दुचाकीला कंटेनरची पाठीमागून जोरात धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील बाप - लेक जागीच ठार, तर दोनजण जखमी झाले आहेत. हा विचित्र अपघात तळेगाव एमआयडीसी रस्त्यावरील नाणोली फाट्याजवळ शनिवारी (दि.३०) सायंकाळी चारच्या सुमारास झाला.
अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहनासह पलायन केले.या अपघातात सुनील बाळू वाघमारे (वय २५ ), आर्या सुनील वाघमारे (वय ४, दोघेही रा. राजपुरी ,ता. मावळ, जि.पुणे) हे बाप - लेक गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. अपघाताचे वृत्त समजतात घटनास्थळी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली.या अपघातात दुचाकीवरील गणेश जाधव, परवीन वाघमारे (दोघेही राहणार टाकवे बुद्रुक, ता. मावळ) हे बाहेर फेकले गेल्याने सुदैवाने बचावले.
दोघांनाही उपचारार्थ तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून ते किरकोळ जखमी आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत सावंत यांनी दिली. सुनील वाघमारे हे दुचाकी चालवत होते. नातेवाईकांना भेटल्यानंतर खेड येथून टाकवे बुद्रूक गावाकडे येत असता नाणोली फाट्याजवळ हा अपघात झाला.
कंटेनर अंगावरून गेल्याने सुनील वाघमारे आणि आर्या वाघमारे हे जागीच ठार झाले. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी करीत आहे.