पुणेकर उकाड्याने हैराण; दिवसा भोवळ, बेशुध्द होणे, भ्रमित होणे, डोकेदुखी, मळमळ त्रासाची शक्यता
By श्रीकिशन काळे | Published: March 26, 2024 05:27 PM2024-03-26T17:27:25+5:302024-03-26T17:37:10+5:30
उष्णतेची लाट येऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी हलके खावे, फळे आणि सलाड सारखे पचायला हलके अन्न घ्यावे
पुणे: शहरातील किमान व कमाल तापमानात वाढ होत असल्याने पुणेकरांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. किमान तापमान हे १८ अंश सेल्सिअसच्या वर पोचले आहे, तर कमाल तापमान चाळशीच्या जवळ नोंदवले जात आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास होऊ शकतो, यासाठी आरोग्य विभागाने देखील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आणखी तापमान वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांचे कमाल तापमान चाळीशीच्या पार गेले आहे. तर पुणे शहराचे तापमानही चाळीत जाण्याच्या मार्गावर आहे. रात्रीचा उकाडाही प्रचंड वाढला आहे. आज अकोल्यातील तापमान तर ४१ अंशावर पोचले आहे. प्रचंड उष्णता असल्याने अंगातील पाणी कमी होते. त्यामुळे नागरिकांना भोवळ येणे, बेशुध्द होणे, भ्रमित होणे, डोकेदुखी, मळमळ वाटणे, लघवी कमी होणे आदी प्रकार होऊ शकतात. त्यासाठी आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, स्वत:ला हायड्रेटेड ठेवा, चहा/कॉफी/दारू पिणे टाळा, सैल सुती कपडे घाला, कडक उन्हात जाणे टाळा.
उष्णतेची लाट येऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी हलके खावे, फळे आणि सलाड सारखे पचायला हलके अन्न घ्यावे. पुरेसे पाणी प्यावे. उन्हात जाताना गॉगल, चष्मे, टोपी घालावे. थंड पाण्याचे अंघोळ करावी. प्रवास करताना पाण्याची बाटली जवळ ठेवावी.