पुण्यात पुढील २ दिवसात उष्णतेची लाट; हवामान खात्याचा अंदाज, जाणून घ्या शहराच्या विविध भागातील तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 01:53 PM2024-05-01T13:53:37+5:302024-05-01T13:53:46+5:30

नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, डिहायड्रेड होऊ नये म्हणून सतत पाणी प्यावे, हवामान तज्ज्ञांचे आवाहन

Heat wave in next 2 days in Pune Weather forecast know the temperature in different parts of the city | पुण्यात पुढील २ दिवसात उष्णतेची लाट; हवामान खात्याचा अंदाज, जाणून घ्या शहराच्या विविध भागातील तापमान

पुण्यात पुढील २ दिवसात उष्णतेची लाट; हवामान खात्याचा अंदाज, जाणून घ्या शहराच्या विविध भागातील तापमान

पुणे : पुणे जिल्ह्यातील ढमढेरे येथे मंगळवारी (दि. ३०) राज्यातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्याचे तापमान दिवसेंदिवस चांगलेच वाढू लागल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. शिरूर ४३.९ आणि मगरपट्टा येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत पुण्यात उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

राज्यात सोलापूरलादेखील एवढेच तापमान होते. एरवी सर्वाधिक तापमान असलेल्या विदर्भातदेखील एवढा पारा चढलेला नाही. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा चांगलाच वर जात आहे. जिल्ह्यातील २८ ऑटोमॅटिक वेदर स्टेशनपैकी ६ स्टेशनवर मंगळवारी (दि. ३०) चाळिशीच्या आत तापमान होते आणि २२ स्टेशनवर चाळिशी पार तापमान नोंदवले गेले. यावरून पुणे किती तापत आहेत, ते स्पष्ट होत आहे.

मध्य प्रदेश ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाची द्रोणिका रेषा गेलेली असून, त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातही पुढील दोन दिवस उष्ण व दमट हवामान राहणार आहे. रायगड, मुंबई येथे उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. विदर्भापेक्षा आता पुणे जिल्ह्यातील तापमानाचा पारा वर चढू लागला आहे. विदर्भात अकोल्यामध्ये ४३.९ अंशांवर तापमानाची नोंद झाली.

पुण्यात अनेक ठिकाणे चाळिशीपार 

पुणे शहरातील अनेक भागातील तापमान चाळिशीवर गेले आहे. त्यामध्ये मगरपट्टा, वडगावशेरी, कोरेगाव पार्क, हडपसर, एनडीए, शिवाजीनगर, पाषाणचा समावेश आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुण्यातच २२.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे रात्रीदेखील पुणेकरांची झोप उडालेली आहे.

पुणे कमाल तापमान

ढमढेरे - ४४.०

शिरूर - ४३.९
मगरपट्टा - ४३.०

वडगावशेरी - ४२.९
कोरेगाव पार्क - ४२.७

पुरंदर - ४२.७
राजगुरूनगर - ४२.५

इंदापूर - ४२.५
हडपसर - ४२.१

चिंचवड - ४१.९
शिवाजीनगर - ४१.७

बारामती - ४१.१
लोणावळा - ३९.०

पुणे जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून, बुधवारीदेखील ही लाट असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे. डिहायड्रेड होऊ नये म्हणून सतत पाणी प्यावे. बुधवारनंतर तापमान हळूहळू कमी होईल. - डॉ. अनुपम कश्यपी, माजी हवामानशास्त्रज्ञ

Web Title: Heat wave in next 2 days in Pune Weather forecast know the temperature in different parts of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.