पुणे जिल्ह्यात उष्णतेची लाट; दोन दिवसात पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 03:28 PM2022-04-14T15:28:41+5:302022-04-14T15:56:33+5:30
पुणे जिल्ह्यातही आगामी दोन दिवस अंशतः ढगाळ हवामान राहणार...
शेलपिंपळगाव : महाराष्ट्रावर पुढील दोन दिवस हवेचा दाब १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतका कमी राहणार असून हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. परिणामी ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी होणार आहे, त्या परिसरात पावसाची बरसात होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला.
डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी लोकमतने बदलत्या हवामान संदर्भात संवाद साधला असता ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातही आगामी दोन दिवस अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे. त्यामुळे पावसाची शक्यता व तेच वातावरण आठवडाभर टिकून राहील. जेव्हा हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र असते, तेव्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढग जमा होतात व पावसाची शक्यता निर्माण होते. सध्या कमाल व किमान तापमानात घट होणे शक्य आहे. त्याशिवाय सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता घटत असून हवामान उष्ण व कोरडे राहील.
बाष्पीभवनाचा वेग वाढेल. तसेच वाऱ्याचाही वेग वाढेल. याकाळात पिकांची, मानवाची,पक्ष्यांची व प्राण्यांची पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली जाणार आहे. फळबागांना आच्छादन करणे, ठिबक सिंचनद्वारे पाणी देणे व फळ बागेवर ८ टक्के के ओलिनची फवारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे फळबाग वाचण्यास मदत होईल. दोन दिवसात पावसाची शक्यता असल्याने पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कांदा पिकाची काढणी करावी. पुणे जिल्ह्यात यापुढील आठवडाभरात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस व किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहणार आहे. गुरुवार दि १४ व शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे.
सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते ५० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १२ टक्के राहणार आहे. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १३ टक्के किमी वेगाने राहील. यावेळी वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. परिणामी हवेचे दाब कमी होईल त्याठिकाणी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.
शुक्रवारी (दि.१५) बंगालच्या उपसागरात दुसऱ्या चक्रीवादळाची निर्मिती होईल. उष्णतेची लाट व ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता अशी विचित्र हवामान स्थिती, अस्थिर वातावरणाच्या हवामानामुळे जाणवेल. हवामान बदलाचा हा परिणाम आहे. एप्रिल महिन्यात होणारा पाऊस हा साधारणपणे ला-निना व अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे तापमान वाढल्यामुळे होईल.
कृषी सल्ला -
- काढणीस तयार हरभरा,गहू पिकाची कापणी आणि मळणीची कामे पूर्ण करावीत.
- नारळाच्या नवीन लागवड केलेल्या रोपांना काठीचा आधार देऊन सावली करावी.
- द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची कामे पूर्ण करावीत.
- उन्हाळी भुईमूग पिकावरून मोकळा ड्रम फिरवावा.