Maharashtra | राज्यात उष्णतेची लाट, विजेची बचत करा; महावितरणकडून आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 11:43 AM2022-04-26T11:43:10+5:302022-04-26T11:43:48+5:30
पुणे : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत विक्रमी वाढ झालेली आहे. वीजबिलांच्या बचतीसाठी तसेच ...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत विक्रमी वाढ झालेली आहे. वीजबिलांच्या बचतीसाठी तसेच सद्यस्थितीत विजेची मागणी देखील वाढत असल्याने सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी आवश्यकतेनुसारच वीज वापर करावा. विशेषतः सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा कमीत कमी वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
विजेच्या बचतीसाठी घर किंवा कार्यालयांमध्ये भरपूर असलेल्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा. ज्यावेळी उपयोगात नसतील तेव्हा घरातील विद्युत उपकरणे व लाईट बंद करणे आवश्यक आहे. वीजबिलात वाढ करणाऱ्या उपकरणांमध्ये पंखे, एअर कंडिशनर, गीझर, वॉशिंग मशीन, इस्त्री, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, ज्युसर, फूड प्रोसेसर, मिक्सर, ग्राइंडर, कॉम्प्युटर, चार्जर, व्हॅक्यूम क्लीनर अशा उपकरणांचा समावेश होतो. ही उपकरणे वीज बचतीच्या जाणिवेने वापरात आणली तर निश्चितच वीज बचतीला मोठा वाव आहे. उन्हाळ्यात फ्रीजमधून एकेक भाजी किंवा थंड पदार्थ काढण्याऐवजी आवश्यक भाज्या किंवा पदार्थ एकदाच काढावेत. दरवाजा सतत उघडावा लागला तर फ्रीजमधील तापमान वाढत जाते आणि विजेचा वापर जास्त होतो. टीव्ही, डिश टीव्ही, संगणक आदी उपकरणे रिमोट कंट्रोलऐवजी थेट स्विच बोर्डपासून बंद केला तर विजेची बचत होऊ शकते.
उन्हाळ्यात एअर कंडिशनरचा (एसी) वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. एसीला पंख्यापेक्षा नऊपट अधिक वीज लागते. त्यामुळे एसीची गरज नसल्यास शक्यतो पंखाच वापरावा. एसी वापरायचा असल्यास नियमितपणे त्याचे फिल्टर तपासणे, स्वच्छ करणे, एसी सुरू असताना दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद करणे आवश्यक आहे. गारवा निर्माण झाला की शक्य असल्यास एसी बंद करावा व पंखा वापरावा. स्मार्ट मोबाईल, लॅपटॅप, टॅबला सतत चार्जिंग करावे लागते. त्यामुळे या वस्तूंचे चार्जिंग झाल्यानंतर चार्जिंगचे बटण बंद करण्याचा कंटाळा करू नये. तसेच इमारतींमध्ये दोन लिफ्ट असल्यास एखादी लिफ्ट लवकर येईल म्हणून दोन्ही लिफ्टचे बटण दाबले जातात. त्यापेक्षा ज्या लिफ्टचे बटण दाबले ती लिफ्ट येईपर्यंत प्रतीक्षा करावी असे अनेकविध उपाय करून वीजबचतीला हातभार लावावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.