स्फोटामुळे हादरला सातारा रस्ता, भिंती फुटल्या अन् शटरही तुटले...! 4 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 07:57 AM2023-05-01T07:57:17+5:302023-05-01T12:59:54+5:30
सातारा रोडवरील डी मार्ट शेजारील इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानांमध्ये मध्यरात्री भीषण स्फोट, चार दुकाने जळून खाक, मोठ्याप्रमाणावर वित्त हानी
पांडुरंग मरगजे
धनकवडी : सातारा रोडवरील डी मार्ट शेजारच्या इंद्रनिल सोसायटीतील इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्स च्या दुकानांत झालेल्या स्फोटामुळे भिषण आग लागून चार दुकाने जळून खाक झाली.ही घटना सोमवारी ( दि.१) मध्यरात्री दोन वाजता घडली. एकापाठोपाठ एक झालेल्या तीन स्फोटांच्या आवाजाने सारा परिसर दणाणून गेला. भर मध्य रात्री नागरिक घाबरून घरातून बाहेर पडले. तर रस्त्यावरील वाहतूक थांबली.वहाने व पादचारी काही काळ भितीने एकाच जागी खिळून राहिले. वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी सदैवाने रात्री ची वेळ असल्याने जिवीत हानी आणि मोठी अनर्थ टळला.
स्फोटाची तिव्रता इतकी प्रंचड होती की, त्या धक्क्याने दोन मजली इमारतीची पडझड झाली. दुकानांचे शटर तुटून पडले, भिंती पडल्या, दगड, विटा व इतर साहित्य मुख्य रस्त्यावर विखरून पडले. दुकानाच्या काउंटर, शोकेस व केबिनच्या काचा फुटून तब्बल चाळीस फुट बीआरटी मार्गा पर्यंत जाऊन पडल्या, रस्त्यावर काचांचा खच पडला. काचेचे तुकडे उडाल्याने पादाचारी जखमी झाला. आगीमुळे एक दुचाकी पूर्ण जळून खाक झाली होती.
स्फोटामुळे लागलेल्या भिषण आगीत देवयानी इलेक्ट्रॉनिक्सचे दोन गाळे, गृहिणी किचन आणि देवयानी मोबाईल शाँपी संपूर्ण जळून खाक झाली. यात होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स व मोबाईल शॉपी अशी दुकाने होती. लागलेल्या भीषण आगीत अनेक गॅस शेगड्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तू अर्धवट जळालेल्या स्थितीमध्ये सर्वत्र विखरून पडल्या.या दुर्घटनेत दुकानाचे मालक समीर कोलते सुद्धा गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान आगीची माहिती मिळताच कात्रज, कोंढवा आणि सिंहगड रोड अग्निशमन केंद्राच्या मिळून ०६ फायरगाड्या ०२ वॉटर टँकर व ०१ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आठ गाड्यांनी आग आटोक्यात आणली.
विखुरलेल्या काचा व इतस्ततः पडलेल्या वस्तू साफ करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत मोकळा करण्यात आल्याने रस्ते वाहतूक सुरळीत झाली. नगरसेवक महेश वाबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सच्या दुकानांत उन्हाळ्यात तापमान वाढून शाॅक सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज असून पोलीस तपास करत आहेत.