इंदापूर तालुक्यात भिगवणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांच्या घरात शिरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 03:31 PM2021-06-03T15:31:01+5:302021-06-03T15:31:12+5:30
पावसाचे पाणी जाण्यासाठी सक्षम व्यवस्था नसल्यामुळे अनेक वेळा असा नुकसानीचा प्रकार घडला आहे
पुणे: भिगवण परिसरात झालेल्या जोरदार मान्सून पूर्व पावसाने अनेक ठिकाणी पाणी वाहत घरात घुसल्याने नागरिकांचे नुकसान झाले. बुधवारी संध्याकाळी झालेल्या या पावसाची ७१ मिलीमीटर नोंद झाल्याची माहिती ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहायक देविदास फलफले यांनी दिली.
भिगवण परिसरात झालेल्या या मान्सून पूर्व पावसाने भिगवण ट्रामा सेंटर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच थोरात नगर येथील शासकीय रो हाउस मध्ये पाणी वेगाने घुसल्याचे दिसून आले. या पाण्याला असणाऱ्या वेगामुळे कोविड सेंटर आवारात लावलेल्या काही दुचाकी वाहून गेल्या. तसेच इमारतीची संरक्षक भिंत कारवर पडल्यामुळे नुकसान झाले.
पुणे सोलापूर महामार्गावर पावसाचे पाणी वाहून नेणारी सक्षम व्यवस्था नसल्यामुळे मार्गाच्या जवळपास १ किलोमीटर अंतरावरील पाणी बस स्थानक पुलाखालून वाहत येत असल्याचे यावेळी दिसून आले. अगदी ढगफुटी झाल्यासारखे पाणी पुलाखालून वाहत होते. या पाण्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र ट्रामा केअर सेंटर पाठीमागील डॉक्टरांच्या निवास स्थाना समोरून पाणी वेगात वाहत या रो हाउस परिसरात घुसले.
काही रो हाउस मध्ये पश्चिमेच्या बाजूने घुसलेले पाणी पूर्वेला धबधबे वाहत असतात त्याप्रमाणे वाहत असल्याचे पहावयास मिळाले. यातून अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसाचे पाणी जाण्यासाठी सक्षम व्यवस्था नसल्यामुळे अनेक वेळा असा नुकसानीचा प्रकार घडला आहे.