राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट; मराठवाडा, विदर्भात ४ दिवस पावसाबरोबरच गारपीटचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 07:33 PM2022-01-08T19:33:22+5:302022-01-08T19:39:55+5:30
विदर्भात ९ जानेवारी रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे
पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मध्य भारताच्या दिशेने आर्द्रतायुक्त वार्यांचा संगम होत आहे. पुढील ३ ते ४ दिवस मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टरबन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात पुढील ४८ तासात पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता असून मध्य भारतात ९ ते १२ जानेवारी दरम्यान गडगडाटीसह पावसाची शक्यता आहे.
राज्यात शनिवारी अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. त्यामुळे विदर्भात बर्याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १२.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरुन आर्द्रतायुक्त वारे मध्य भारतापर्यंत येत आहे. हे दोन्हीकडील वारे एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यातून राज्यात गडगडाटासह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये ९ व १० जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व गारा पडण्याची शक्यता आहे. लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भात ९ जानेवारी रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १० ते १२ जानेवारी दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहर व परिसरात पुढील ३ दिवस आकाश दुपारनंतर अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.