बारामती, इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस
By Admin | Published: June 3, 2016 12:45 AM2016-06-03T00:45:02+5:302016-06-03T00:45:02+5:30
बारामती शहरासह इंदापूर परिसराला गुरुवारी (दि.२) मेघगर्जनेसह सुमारे दीड तासाहून अधिक काळ मुसळधार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी साडेसहा वाजता पावसाला सुरुवात झाली
बारामती : बारामती शहरासह इंदापूर परिसराला गुरुवारी (दि.२) मेघगर्जनेसह सुमारे दीड तासाहून अधिक काळ मुसळधार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी साडेसहा वाजता पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. बारामतीत मात्र, पहिल्याच पावसात नगरपालिकेच्या नालेसफाई पोलखोल झाली.
या पावसामुळे बारामती शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. शहरातील नाल्यांची तसेच भूमिगत गटारांची सफाई न झाल्याने काही भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. शहरातील नगरपालिकेच्या समोरचा रस्ता, इंदापूर रस्ता, इंदापूर चौक, तांदूळवाडी वेस आदी भागांत पावसाचे पाणी साचले होते. तर, तांदूळवाडी भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले.
शहरातील वसंतराव पवार मार्गावर भूमिगत गटारांची सफाई न झाल्याने ड्रेनेजमधून पाणी उफाळून बाहेर येत होते. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात नगरपालिका प्रशासन अपयशी ठरल्याने नागरिक तसेच वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तांदूळवाडी वेस येथील कदम चौकापासून महावीर पेठ रस्त्यापर्यंत ठिकठिकाणी पावसाची तळी साठली होती. नाले सफई न झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागा मिळाली नाही. तर, कदम चौकातील दुकानांमध्येही पाणी शिरले. कऱ्हा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना गुडघ्याएवढे पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत होती. गुरुवार हा बाजार दिवस असल्याने परिसरातून आलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांची पावसाने त्रेधा उडाली. त्यानंतर ८.३० नंतर पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शहरातील उकाडाच गायब झाला.
सविस्तर वृत्त / पान २
दोघे जण चेंबरमध्ये पडले
बारामतीचा आज आठवडे बाजार असल्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी गावोगावच्या ग्रामस्थांची गर्दी होते. जवळपास दीड तास पावसाने झोडपल्याने भाजीपाला विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. मंडईत पाणी साठले. ते पाणी चेंबरमधून जाण्यासाठी झाकण काढले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी आलेले दोघेजण चेंबरमध्ये पडले. सुदैवाने त्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आले.