Lonavala Rain: लोणावळ्यात पावसाचा जोर कायम; शाळांना उद्या आणि परवा सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 05:23 PM2024-07-24T17:23:09+5:302024-07-24T17:23:53+5:30
शहरातील अनेक भागात झाडपडी, वाहतूककोंडी तसेच गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे
लोणावळा: लोणावळ्यात मंगळवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यावर्षीच्या सर्वाधिक म्हणजेच 24 तासात शहरात तब्बल 275 मिलिमीटर (10.83 इंच) पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. म्हणून लोणावळ्यात खबरदारीच्या अनुषंगाने १२ वी पर्यंतच्या शाळांना उद्या आणि परवा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नांगरगाव आदर्श सोसायटी समोरील रस्ता, शहाणी हॉलिडे होम समोरील रस्ता, नारायणी धाम समोरील रस्ता, बापदेव मंदिरासमोरील वलवण गावाकडे जाणारा रस्ता, वलवण नांगरगाव रस्ता, बाजारभागातील रस्ते अशा अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. छोटे मोठे नाले हे ओसंडून वाहत असून इंद्रायणी नदीच्या पाणीपात्रात देखील मोठी वाढ झाली आहे. कार्ला, मळवली, सदापुर या भागामध्ये इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरले आहे. देवले ते मळवली या रस्त्यावर जवळपास दीड ते दोन फूट पाणीच असल्याने नागरिकांना या पाण्यामधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.
सलग आठ दिवस शहरात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी सुरू होत्या. रात्री देखील वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला आहे. लोणावळा शहरामध्ये यावर्षी आज अखेरपर्यंत 2601 मिमी (102.40 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज पर्यंत 2503 मिमी (98.54 इंच) पाऊस नोंदवण्यात आला होता. आज देखील पावसाचा जोर कायम असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.