Pune Rain: पुण्यात पावसाचा जोर कायम; सिंहगड रस्त्याला नद्यांचे स्वरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 01:38 PM2024-08-04T13:38:35+5:302024-08-04T13:40:25+5:30
नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. तसेच दोन ते तीन दिवस पर्यटन टाळावे - प्रशासनाच्या सूचना
पुणे : पुणे जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे काल रात्रीपासूनच पुण्यात संततधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पूरपरिस्थिती निरमा होणाऱ्या भागात उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील बऱ्याच भागात पाणी साचले असून सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र समोर आले आहे. शहराच्या सिंहगड रोड भागात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे.
पुण्यात पावसाचा जोर कायम; सिंहगड रस्त्याला नद्यांचे स्वरूप#punerain#sinhgadroad#khadakwasaladam#Riverpic.twitter.com/b5P2ONGGgP
— Lokmat (@lokmat) August 4, 2024
पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. पुण्यातील पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरपरिस्थिती भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी आहे. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्याने प्रशासनाने कामासाठीच बाहेर पडावे अशा सूचना दिल्या आहेत. पाऊस आणि घाटमाथ्यावर होणारा मुसळधार पाऊस पाहता नागरिकांनी दोन ते तीन दिवस पर्यटन टाळावे अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊ लागल्याने नदीकाठच्या भागांमध्येही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. घरांमध्ये पाणी शिरू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुक्ख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार धोकादायक भागात भारतीय सेना, एनडीआरएफ दाखल झाले आहेत.