धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:55 AM2018-08-21T01:55:53+5:302018-08-21T01:56:15+5:30

१३ तालुक्यांत सरासरीच्या ६८३.६ मि. मी. पाऊस; धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला

Heavy rain in the dam area | धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी

धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी

Next

पुणे : जिल्ह्यात पावसाने गेल्या आठवड्यापासून जोरदार कमबॅक केले असून खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, मुळशी व मावळ या तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीच्या ६८३.६ मि.मी. पाऊस झाला आहे. धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने भाटघर, चासकमान, आसखेड, डिंभे धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात सोमवारी वाढ केली आहे. मात्र, जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त इंदापूर, दौैंड व शिरूर या तालुक्यांत पावसाने तुरळक हजेरी लावली. यामुळे येथील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात दर वर्षी सरासरी ८४५ मिलिमीटर पाऊस पडतो. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या वर्षी पावसाने दमदार आगमन केले. पहिल्या इनिंगमध्येच पावसाने जूनची सरासरी ओलांडली. विशेष म्हणजे, नेहमी अवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्यांत सुरुवातीलाच आगमन केल्याने या वर्षी तेथील परिस्थिती बदलेल, अशी आशा होती; मात्र नंतर पावसाने ओढ दिली.
जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांत सरासरी ४५० मिलिमीटर इतका पाऊस होतो. आतापर्यंत ६८३.६ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जून ते आॅक्टोबर महिन्यात ८२३.६ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस होतो. आतापर्यंत या सरासरीच्या १३५ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक मावळ तालुक्यात १,९३१.३ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, तो टक्केवारीत १५८ इतका आहे. तर, त्याखालोखाल मुळशी तालुक्यात १,८३१.४६२ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या ११५ टक्के पाऊस झाला आहे. भोर १२३.१ टक्के, जुन्नर ९७.८ टक्के, खेड ७६.१ तर पुरंदर ५०.३ टक्के पाऊस झाला आहे.

भामा-आसखेडमधून ३ हजार २८० क्युसेक्सने विसर्ग
आसखेड : थोडाकाळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, पुन्हा मुसळधार पडल्याने भामा आसखेड धरणातील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे; तसेच या धरणांमधून भामा नदीत ३ हजार २८० क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाचे भारत बेंद्रे यांनी दिली. पावसाचा जोर वाढल्याने प्रवाह सकाळी ५५३ क्युसेक्सवरून १६५३ क्युसेक्स करण्यात आला, तर संततधार पावसाने सकाळपासूनच जोर धरल्याने प्रवाह वाढविण्यात आला आहे. त्यानंतर धरणात येणाºया प्रवाहाचा विचार करून विसर्ग जास्त करण्यात येईल. तरी नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन भारत बेंद्रे यांनी केले आहे.

दौंड, बारामती, शिरूर या तालुक्यांना दमदार पावसाची आशा
जिल्ह्यातील नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बारामती, इंदापूर, दौैंड व शिरूरमध्ये पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. बारामतीत ३४.४ टक्के पाऊस झाला आहे. इंदापूरला ४०, दौैंडला २६ तर शिरूरला २७.३ टक्के पाऊस झाला. त्यामुळे येथे दुष्काळसदृृश परिस्थिती निर्माण होत आहे. विहिरींचा पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांना चार व पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

Web Title: Heavy rain in the dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.